भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक कसोटी सामना एजबस्टन येथे खेळवला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून इंग्लंड पहिल्या डावात अद्याप पिछाडीवर आहे. या सामन्यात दोन्ही देशांच्या खेळाडूंदरम्यान किरकोळ शाब्दिक वाद होताना दिसत आहेत. सामन्याच्या पहिल्या डावात ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाच्या शानदार शतकांमुळे भारतीय डावाला आकार मिळाला. रविंद्र जडेजाच्या या कामगिरीमुळे जेम्स अँडरसनच्या मात्र, पोटात दुखायला लागले आहे. जडेजा स्वत:ला आता फलंदाज समजत असल्याचा खोचक टोमणा अँडरसन मारला आहे. त्याला जडजाने सडेतोड उत्तर दिले आहे.

एजबस्टन कसोटीत रविंद्र जडेजाने १०४ धावांची खेळी करत इंग्लंडमधील पहिले कसोटी शतक साजरे केले. त्याच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ४१६ धावांपर्यंत मजल मारता आली. या दरम्यान इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने जडेजाच्या खेळीबाबत वक्तव्य केले. जेम्स अँडरसन म्हणाला, “भारतीय संघातील हा अष्टपैलू खेळाडू स्वत:ला आता फलंदाज समजू लागला आहे. तो आता थोडा वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत आहे. त्याला फलंदाजीची समज आल्यामुळे आमच्या अडचणी वाढल्या आहेत.”

हेही वाचा – VIDEO : विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोचे मैदानात जुंपले भांडण!

रविंद्र जडेजाने अलीकडच्या काळात फलंदाज म्हणून उत्कृष्ट खेळ केला आहे. एजबस्टन येथे केलेल्या शतकानंतर त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या टोमण्याला प्रत्युत्तर दिले. अँडरसनच्या विधानाबाबत पत्रकार परिषदेत जडेजाला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “जेव्हा मी धावा करतो तेव्हा प्रत्येकजण म्हणतो मी आता फलंदाज झालो आहे. मी नेहमी खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. ही चांगली गोष्ट आहे की २०१४ नंतर जेम्स अँडरसनला समजले की मी फलंदाजी करू शकतो.”

रविंद्र जडेजा आणि जेम्स अँडरसन यांच्यामध्ये आठ वर्षांपासून काहीना काही वाद सुरू आहेत. २०१४ मध्ये झालेल्या एका कसोटी सामन्यात दोघांचा जोरदार वाद झाला होता. तेव्हा जेम्स अँडरसनने रविंद्र जडेजाला ड्रेसिंग रूममध्ये येऊन मारण्याची धमकी दिली होती.

Story img Loader