भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबस्टन कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रित बुमराहने तुफान फटकेबाजी केली. त्याने केवळ स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा फटकावल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची ही तुफान फटकेबाजी बघून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही आश्चर्य वाटले आहे. सचिनने ट्वीट करून बुमराहचे कौतुक केले आहे.

एजबस्टन कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताच्या डावातील ८४वे षटक स्टुअर्ट ब्रॉड फेकत होता. या षटकामध्ये भारतीय कर्णधार जसप्रित बुमराहने ब्रॉडच्या जुन्या जखमेवरील खपली काढण्याचे काम केले. बुमराहने ब्रॉडच्या एका षटकामध्ये ४, ५, ७, ४, ४, ४, ६, १ अशी फटकेबाजी करत तब्बल ३५ धावा फटकावल्या. २००७मध्ये माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगने अशीच कामगिरी केली होती. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकामध्ये ३६ धावा कुटल्या होत्या. आज बुमराहची कामगिरी बघून सचिन तेंडुलकरला युवराजची आठवण आली. त्याने ट्वीट करत, ‘हा युवराज आहे की बुमराह?’ अशा प्रश्न विचारला आहे.

भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर अनेक नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. त्याच्याविरुद्ध युवराज सिंगने ६ षटकार मारले होते. आता कर्णधार जसप्रीत बुमराहने एका षटकात ३५ धावा जमा केल्या आहेत. एजबस्टन कसोटीतील ब्रॉडचे हे षटक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले आहे.

Story img Loader