भारत आणि इंग्लंड दरम्यान ‘पतौडी चषका’तील पाचवा आणि निर्णयक सामना एजबस्टन येथे खेळवला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारतीय संघाकडे पहिल्या डावात चांगली आघाडी आहे. तर, फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडचा डाव गडगडल्याच्या स्थितीममध्ये आहे. अशातच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेत सुरू झाला. मात्र, सुरुवातीलाच विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात वाद झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली प्रथम बेअरस्टोपर्यंत चालत गेल्याचे दिसत आहे. कोहलीने त्याला क्रिझमध्ये उभे राहण्याचा इशारा केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. भारताचा माजी कर्णधार हातवारे करताना दिसला. त्यानंतर त्याने बेअरस्टोला गप्प राहण्याचाही इशारा केला.
त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स कोहलीशी चर्चा करताना दिसला. शेवटी हा वाद निवळला आणि कोहलीने स्मितहास्य करून बेअरस्टोच्या हातावर ठोसा मारला. विशेष म्हणजे, कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या विश्रांतीदरम्यान कोहली आणि बेअरस्टो एकत्र हसत मैदानाबाहेर जाताना दिसले होते.