India vs England ICC Cricket World Cup 2023 Live Match Updates: वर्ल्ड कप २०२३चा २९वा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाने आपल्या पहिल्या दोन फलंदाजांच्या विकेट्स झटपट गमावल्या. त्यात विराट कोहली शून्यावर बाद होण्याचाही समावेश आहे. खाते न उघडताच बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या बार्मी आर्मीने कोहलीची खिल्ली उडवली आहे. त्यावर भारतीय चाहत्यांनी बार्मी आर्मीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मोठा फटका मारण्याच्या नादात किंग कोहली भोपळाही फोडू शकला नाही आणि डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिडऑफवर झेलबाद झाला. इंग्लंड क्रिकेट संघाच्या फॅन ग्रुपने दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. बार्मी आर्मी फॅन ग्रुपने अनुभवी फलंदाजा कोहलीची खिल्ली उडवत असल्याचे पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या चित्रांवरून स्पष्ट दिसत आहे.
आता या पोस्टनंतर भारतीय चाहते संतप्त झाले असून ते पोस्टमधील कमेंट्सच्या माध्यमातून इंग्लंडच्या बार्मी आर्मीवर सातत्याने निशाणा साधत आहेत. यामध्ये एका भारतीय चाहत्याने लिहिले की, “तुम्ही गुणतालिकेत खालील बाजूने पाहा”, असे म्हटले. प्रत्यक्षात या चाहत्याने असे म्हटले कारण, या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. दुसरा चाहता म्हणाला, “त्यांना बोलू द्या, बिचाऱ्यांना खूप वेदना होत आहेत.” आणखी एका चाहत्याने लिहिले की, “तुम्ही आधी रोहितला बाद करून दाखवा. मग बोला.” त्यामुळे एकप्रकारे भारतीय क्रिकेट चाहत्यांनी इंग्लंडच्या बार्मी आर्मीला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
सामन्यात काय झाले?
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ४० धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. शुबमन गिल नऊ धावा करून बाद झाला, विराट कोहली खाते न उघडता बाद झाला आणि श्रेयस अय्यर चार धावा करून बाद झाला. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोहलीला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी श्रेयस पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर बाद झाला. यानंतर रोहितने के.एल. राहुलबरोबर चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. राहुल ५८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३९ धावा करून बाद झाला. दरम्यान, रोहितने वन डे कारकिर्दीतील ५४ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६६ चेंडूत पन्नास धावा केल्या. यानंतर रोहितने सूर्यकुमारसोबत पाचव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. शतकापासून १३ धावा दूर, आदिल रशीदच्या चेंडूवर रोहित लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद झाला. त्याने १०१ चेंडूत ८७ धावांच्या खेळीत १० चौकार आणि तीन षटकार ठोकले. रवींद्र जडेजा आठ धावा करून बाद झाला.
शेवटच्या काही षटकात सूर्याने चांगले फटके मारले आणि भारताची धावसंख्या २००च्या पुढे नेली. तो ४७ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ धावा करून बाद झाला. शमी एक धाव काढून बाद झाला. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी नवव्या विकेटसाठी २१ धावांची भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर बुमराह धावबाद झाला. त्याला २५ चेंडूत १६ धावा करता आल्या. कुलदीप नऊ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून विलीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याला ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत मदत केली. मार्क वुडला एक विकेट मिळाली.