गेल्यावर्षी अर्धवट राहिलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. तिथे १ जुलै ते ५ जुलै याकाळात दोन्ही संघादरम्यान शेवटचा कसोटी सामना होणार आहे. मुख्य सामन्यापूर्वी लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या अप्टॉनस्टील काउंटी मैदानावर एक चार दिवसीय सराव सामना होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. आजपासून (२३ जून) सुरू होणाऱ्या या सामन्यादरम्यान भारतीय कसोटी संघात फूट पडलेली दिसणार आहे.

भारतीय संघातील चार तारांकित खेळाडू लीसेस्टरशायरकडून खेळणार आहेत. ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा लीसेस्टरशायरच्या संघाकडून सराव सामन्यात भाग घेणार आहेत. लीसेस्टरशायरच्या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश झाल्यामुळे संघातील सर्व सदस्यांना इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुरेसा सराव करण्याची संधी मिळणार आहे. वर्कलोड मॅनेजमेंट पाहता दोन्ही संघातून १३-१३ खेळाडू खेळतील.

याशिवाय, भारतीय निवड समितीने नवदीप सैनी, कमलेश नागरकोटी आणि सिमरजीत सिंग यांना इंग्लंड दौऱ्यासाठी नेट बॉलर म्हणून सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सैनी आणि नगरकोटी संघासोबत आहेत तर सिमरजीत सिंग लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे.

भारतीय संघ गेल्या वर्षी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. मात्र, करोनाच्या संकटामुळे पाचवा सामना न खेळताच भारतीय संघ मायदेशी परतला होता. हाच एक सामना खेळून मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ आता इंग्लंडला गेला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. पाचवा आणि शेवटचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करताना दिसेल.

हेही वाचा – मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ग्राउंड्समन होणार मालामाल! प्रत्येकी मिळणार एक लाख रुपये

दरम्यान, मालिका पुढे ढकलण्यात आल्यापासून दोन्ही संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले. इंग्लंडनेही जो रूटच्या जागी अष्टपैलू बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे कर्णधारपद दिले आहे. याशिवाय दोन्ही संघांचे मुख्य प्रशिक्षकदेखील बदलले आहेत. भारतीय संघ राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तर यजमानांचा संघ ब्रँडन मॅकक्युलमच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसणार आहे.

असे असतील दोन्ही संघ

लीसेस्टरशायर संघ: सॅम्युअल इव्हान्स (कर्णधार), रेहान अहमद, सॅम्युअल बॅट्स (यष्टीरक्षक), नॅथन बॉली, विली डेव्हिस, जो इव्हिसन, लुईस किम्बर, एविडाइन स्कँद, रोमन वॉकर, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा.

भारत संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

Story img Loader