Adil Rashid dismissed Hardik Pandya in IND vs ENG 3rd ODI : भारत आणि इंग्लंड याच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताने शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर ३५६ धावांचा डोंगर उभारला. मात्र, यादरम्यान इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने हार्दिक पंड्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत त्याचा त्रिफळा उडवला ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या सामन्यात हार्दिक पंड्या चौथ्या विकेट्सच्या रुपाने बाद झाला. त्याला इंग्लंडचा स्टार फिरकीपटू आदिल रशीदने तंबूचा रस्ता दाखवला. हार्दिक पंड्याने बाद होण्यापूर्वी आदिलच्या षटकात सलग दोन षटकार मारले होते. मात्र, यानंतर आदिल रशीदने त्रिफळा उडवत बदला घेतला. यावेळी हार्दिक पंड्याला आपला त्रिफळा कसा उडाला हे समजले नाही. कारण तो बचावात्मक शॉट खेळत होता, ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे.
आदिल रशीदविरुद्ध विराटचा रेकॉर्ड खराब –
एकदिवसीय सामन्यांमध्ये रशीदविरुद्ध कोहलीचा रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. या फॉरमॅटमध्ये, तो रशीदविरुद्धच्या १० डावांमध्ये पाच वेळा बाद झाला आहे. या काळात विराटने रशीदचे १३० चेंडू खेळले आहेत आणि ११२ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी २२.४० आणि स्ट्राईक रेट ८६.१५ आहे. फक्त रशीदच नाही, तर २०२४ पासून कोहलीचा एकदिवसीय सामन्यांमध्ये लेग-स्पिनर्सविरुद्धचा रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. या काळात, चार डावांमध्ये, कोहलीने लेग स्पिनविरुद्ध ४० चेंडू खेळले आहेत आणि २६ धावा केल्या आहेत. तो चार वेळा बाद झाला आहे.
शुबमन गिलचे शतक आणि विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांमुळे भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३५७ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाचा डाव ५० षटकांत ३५६ धावांवर संपला. अहमदाबादमध्ये एकदिवसीय सामन्यात केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडकडून फिरकी गोलंदाज आदिल रशीदने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. भारताकडून गिलने १०२ चेंडूत १४ चौकार आणि तीन षटकारांसह ११२ धावा केल्या, तर श्रेयसने ७८ आणि कोहलीने ५२ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर आलेला केएल राहुल ४० धावा करून बाद झाला.