भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. १ जुलै ते ५ जुलै या कालावधीमध्ये दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मुख्य सामन्यापूर्वी खेळाडूंना सराव म्हणून लिसेस्टरशायर येथे चार दिवसीय सराव सामनाही घेण्यात आला. मात्र, या सराव सामन्यादरम्याच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला करोनाची लागण झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.
बीसीसीआयने ट्वीट करून सांगितले की, “भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शनिवारी झालेल्या रॅपिड अँटीजन चाचणीमध्ये करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो सध्या संघाच्याच हॉटेलमध्ये विलगीकरणामध्ये असून बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवत आहे.” करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भारतीय कर्णधार कसोटी सामने खेळू शकेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे. जर रोहित कसोटी सामना खेळला नाही तर ऋषभ पंत किंवा जसप्रीत बुमराह यांच्याकडे भारतीय संघाची नेतृत्व असू शकते. याशिवाय, चेतेश्वर पुजाराचाही पर्याय संघ व्यवस्थापनाकडे उपलब्ध आहे.
रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक कसोटीपूर्वी चार दिवसीय सराव सामन्यात लिसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळत होता. रोहितने गुरुवारी पहिल्या डावात फलंदाजी केली पण शनिवारी भारताच्या दुसऱ्या डावात तो फलंदाजीसाठी आला नाही. सराव सामन्याच्या पहिल्या डावात त्याने २५ धावा केल्या.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला फिरकीपटू आर अश्विनला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला संघातील इतर खेळाडूंसोबत इंग्लंडला जाता आले नव्हते. करोनातून बरे झाल्यानंतर तो संघात दाखल झाला. परंतु, चार दिवसांच्या सराव सामन्यात त्याने भाग घेतला नाही. याऐवजी त्याने नेटमध्ये गोलंदाजी केली. दरम्यान, विराट कोहलीलाही करोनाची लागण झाली होती, अशी बातमी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता रोहित शर्माला करोना झाला आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाच्या चिंतेत भर पडली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. गेल्या वर्षी झालेली ही मालिका करोनामुळे अर्धवट सोडावी लागली होती. याच मालिकेतील शेवटचा सामना आता खेळवला जाणार आहे. एजबस्टन येथे होणारा हा सामना निर्णायक असल्याने महत्त्वाचा मानला जात आहे. अशा सामन्यात जर रोहित खेळू शकला नाही तर शुबमन गिलसोबत सलामीला कोण येणार, हा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. कारण, भारताचा सलामीवीर केएल राहुल अगोदर दुखापतीमुळे संघासोबत नाही. सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात श्रीकर भरतने सलामी दिली होती. याशिवाय हनुमा विहारी हा एक पर्याय सध्या उपलब्ध आहे. त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामी दिली होती.