Ind vs Eng 3rd Test Match Highlights : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ४३४ धावांनी मोठा पराभव केला. हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. कसोटी इतिहासातील धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०२१ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला होता. आजच्या विजयात भारतासाठी यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा यांनी मोलाचे योगदान दिले. सामन्यात इंग्लंडला ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १२२ धावांवर गारद झाला.
मार्क वुड वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. वुडने १५ चेंडूत ३३ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीपला दोन बळी मिळाले. बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली, तर विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारताने जिंकली.
या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करत ४४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर गारद झाला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी होती. यानंतर भारताने दुसरा डाव ४ बाद ४३० धावा करून घोषित केला. त्यामुळए एकूण आघाडी ५५६ धावांची झाली. ज्यामुळे इंग्लंड ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १२२ धावांवर आटोपला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. तसेच बुमराह आणि अश्विनने एक विकेट घेतली.
हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : यशस्वी जैस्वाल ‘दादा’वरही पडला भारी! गांगुलीचा मोडला १७ वर्षांपूर्वीचा विक्रम
अष्टपैलू रवींद्र जडेजा ठरला सामनावीर –
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात ११२ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. या अष्टपैलू कामगिरीमुळे रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.