ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने १५१ धावांनी विजय मिळवला आणि यजमानांना गुडघे टेकवण्यास भाग पाडले. लॉर्ड्सवरील विजयाची नोंद करणे हे टीम इंडियासाठी मोठे यश आहे. या सामन्यादरम्यान, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावर मोठा संघर्ष पाहायला मिळाला. आपल्या खेळाडूंसोबत होणारे वादविवाद पाहून भारताचा कर्णधार विराट कोहलीही चांगलाच तापला होता, त्यानेही इंग्लंडच्या खेळाडूंना प्रत्युत्तर दिले. या सर्व प्रकरणार इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन मध्यभागी होता, असे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याच्यावरही टीका होत आहे.

यादरम्यान, अँडरसनचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनच्या फोटोसह वाईट कृत्य करताना दिसत आहे. आयपीएल २०१९दरम्यान, अश्विनने इंग्लिश फलंदाज जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केले. मात्र, नियमानुसार बटलरला पंचांनी बाद घोषित केले. या घटनेनंतर बराच वाद झाला. यानंतर, एका कार्यक्रमादरम्यान, जेम्स अँडरसनने अश्विनच्या फोटोचे तुकडे केले होते. हाच व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IPL सुरू होण्याआधीच सनरायझर्स हैदराबादचा क्रिकेटपटू क्लीन बोल्ड; गर्लफ्रेंडशी केलं लग्न

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी अँडरसनला ट्रोल केले आहे. सध्याच्या मालिकेत अश्विन एकही कसोटी खेळलेला नाही. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया १-०ने आघाडीवर आहे. तिसरी कसोटी २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे खेळली जाणार आहे.

शेवटच्या दिवशी रंगला थरार…

मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांचे अष्टपैलू योगदान तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा १५१ धावांनी धुव्वा उडवला. या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Story img Loader