जसप्रीत बुमराहची गणना जगातील सर्वात घातक गोलंदाजांमध्ये का केली जाते, हे त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सिद्ध केले. बुमराहने यजमानांविरुद्धच्या सामन्यात एकूण ९ बळी घेतले. पहिल्या डावात त्याने चार इंग्लिश फलंदाजांना बाद केले, तर दुसऱ्या डावात अर्ध्या संघाला म्हणजेच पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आपल्या गोलंदाजीच्या बळावर त्याने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या विक्रमाशी बरोबरी साधली. इंग्लंडने पहिल्या डावात १८३ धावा आणि दुसऱ्या डावात ३०३ धावा केल्या.

जसप्रीत बुमराहने सामन्यात ११० धावा देऊन ९ बळी घेतले. बुमराहसह फक्त तीन भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडमध्ये ९ किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. चेतन शर्मा यांनी १९८६मध्ये बर्मिंघममध्ये १८८ धावा देऊन १० विकेट्स घेतल्या. हा सामना अनिर्णित राहिला होता. त्याचबरोबर डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानने २००७मध्ये नॉटिंगहॅममध्येच १३४ धावा देऊन ९ विकेट्स घेतल्या. संघाने हा सामना ७ गडी राखून जिंकला.

 

हेही वाचा – IND vs ENG 1st TEST : पावसामुळे सामना सुरू होण्यास विलंब, टीम इंडियाला विजयासाठी १५७ धावांची गरज

इंग्लंडविरुद्धचा टीम इंडियाचा हा १२७वा कसोटी सामना आहे. संघाने २९ कसोटी जिंकल्या आहेत, तर ४८ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे आणि ४९ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. जर भारताने नॉटिंगहॅमविरुद्धचा सामना जिंकला, तर इंग्लंडवरील हा त्यांचा ३०वा विजय असेल. यापूर्वी फक्त तीन संघांनी इंग्लंडविरुद्ध ३० पेक्षा जास्त कसोटी जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १४६ कसोटी जिंकल्या आहेत. वेस्ट इंडिजने ५८ आणि दक्षिण आफ्रिकेने ३४ कसोटी जिंकल्या आहेत.

भारतीय वेगवान गोलंदाजांची चमकदार कामगिरी

भारतीय वेगवान गोलंदाजांनी पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये सर्व २० विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडमध्ये प्रथमच वेगवान गोलंदाजांनी हा पराक्रम केला. जसप्रीत बुमराहव्यतिरिक्त, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ४ तर मोहम्मद सिराजला ३ बळी मिळाले. यापूर्वी २०१८मध्ये, भारतीय गोलंदाजांनी नॉटिंगहॅममध्येच १९ विकेट्स घेतल्या होत्या.