IND vs ENG Joe Root break Eoin Morgan record : कटकमध्ये भारत आणि इंग्लंड आमनेसामने असून दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने शानदार गोलंदाजी करताना पाहुण्या संघाला ४९.५ षटकांत सर्वबाद ३०४ धावांवर रोखले. दरम्यान या सामन्यात इंग्लंडसाठी जो रुटने सर्वाधिक धावा करत एक नवा विक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जो रूटने ठोकले शानदार अर्धशतक –

इंग्लंडच्या डावातील ११ व्या षटकांत संघाची ८१ धावसंख्या असताना फिलिप सॉल्ट २६ धावा करुन दुसऱ्या विकेट्सच्या रुपाने बाद झाला. यानंतर, जो रूटने हॅरी ब्रूकसह संघाची सूत्रे हाती घेतली आणि इंग्लंडचा धावसंख्या २७ षटकांत १५० धावांपर्यंत पोहोचवली. इंग्लंडला तिसरा मोठा धक्का ३० व्या षटकात हॅरी ब्रूकच्या रूपात हर्षित राणाने दिला. ब्रुकला फक्त ३१ धावा करता आल्या. ब्रूक बाद झाल्यानंतर, रूट आणि कर्णधार जोस बटलर क्रीजवर राहिले आणि इंग्लंडला ३५ षटकांत २०० धावांचा पल्ला गाठून दिला. यानंतर काही वेळातच, जो रूट आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी झाला.

जो रूटने मोडला इऑन मॉर्गनचा विक्रम –

रूटने एकदिवसीय सामन्यात त्याचे ४० वे अर्धशतक झळकावण्याचा महान पराक्रम केला. यासह, या धडाकेबाज फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी एक मोठा पराक्रम केला आहे. खरं तर, जो रूटने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावून इंग्लंडसाठी सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्याचबरोबर रूटने इयान मॉर्गनचा मोठा विक्रम मोडला. मॉर्गनने इंग्लंडसाठी ५५ वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० हून अधिक केल्या आहेत तर रूटच्या नावावर आता ५६ वेळा ५० हून अधिक धावा आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये ४० अर्धशतके झळकावण्याव्यतिरिक्त, रूटने १६ शतके देखील झळकावली आहेत.

इंग्लंडकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करणारे फलंदाज :

  • ५६ – जो रूट
  • ५५ – ओएन मॉर्गन
  • ३९ – इयान बेल
  • ३८ – जोस बटलर
  • ३४ – केविन पीटरसन

जो रूटने इंग्लंडसाठी १७३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४७.५५ च्या सरासरीने ६६१० धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याच्या बाबतीत रूटने आता शिखर धवन आणि व्हिव्ह रिचर्ड्सची बरोबरी केली आहे. त्यानंतर त्याला ६९ धावावंर रवींद्र जडेजाने बाद केले.