इंग्लंडविरूध्दच्या पाचव्या कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून इंग्लिश संघ बॅकफूटवर आहे. इंग्लंड संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताला ४७७ धावांवर सर्वबाद केले खरे पण त्यांच्या दुसऱ्या डावाची सुरूवात मात्र खूपच वाईट झाली.संघाने ३६ धावांवर ३ विकेट्स गमावले. त्यानंतर आपला १०० वा कसोटी सामना खेळत असलेला जॉनी बेयरस्टो मैदानावर येताच बॅझबॉल स्टाईलमध्ये तुफान फटकेबाजी करू लागला. याचदरम्यान मागे फिल्डींग करत असलेल्या शुबमन गिलबरोबरचे त्याचे संभाषण स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले.
शुभमन गिल आणि जॉनी बेअरस्टो यांच्यमध्ये या दरम्यान शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. इंग्लंडच्या फलंदाजाने त्याला पहिल्या डावात बाद झाल्याची आठवण करून देत भारताच्या फलंदाजावर जोरदार प्रहार केला. पहिल्या डावात भारतीय युवा खेळाडूला जेम्स अँडरसनने क्लीन बोल्ड केले. गिलला बाद झाल्याची आठवण करून देताना जॉनी बेअरस्टोने त्याला विचारले: “तू जिमीला थकल्याबद्दल काय म्हणाला होतास आणि त्यानंतर त्याने तुला बाद केले?”
गिलने लगेच त्याला प्रत्युत्तर दिले आणि इंग्लंडच्या स्टार खेळाडूला या मालिकेतील त्याच्या खराब कामगिरीची आठवण करून दिली कारण तो म्हणाला: “मग काय, शतकानंतर म्हणालो. तू इथे किती धावा केल्या आहेस?”
जॉनी बेअरस्टोही मागे हटायला तयार नव्हता, त्याने इंग्लंडमधील गिलच्या विक्रमावर खोचकपणे टीका केली: “तू इंग्लंडमध्ये किती धावा केल्यास?”
या दोघांच्या या शाब्दिक चकमकीमध्ये सर्फराझ खाननेही उडी घेतली. सर्फराझ म्हणाला, “ थोड्या धावा काय केल्या हा किती मिरवतोय.”
यानंतर लगेचच कुलदीप यादवने जॉनी बेअरस्टोला बाद केल्याने शुबमन गिल आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला. डावखुरा फिरकीपटूसमोर एलबीडब्ल्यू आऊट होण्यापूर्वी बेयरस्टोने ३० चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या.बाद झाल्यानंतरही बेयरस्टो गिलला काहीतरी पुटपुटत बाहेर जाताना दिसला.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खूपच खराब झाली.त्यांचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. बेन डकेट २ धावा तर झॅक क्राऊली खाते न उघडताच अश्विनचा बळी ठरले, त्यानंतर आलेला ऑली पॉप स्थिरावू पाहत होता पण अश्विनने त्यालाही माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या बेयरस्टोने मात्र आपली फटकेबाजी सुरू केली. अश्विनच्या गोलंदाजीवर षटकार मारत त्याने संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला.
बेयरस्टो भारतीय दौऱ्यावर काही खास कामगिरी करू शकला नाही. पण या सामन्यात मात्र येताच त्याने जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. पण तो जास्त काळ मैदानात टिकू शकला नाही. त्यानंतर अश्विनने बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड करत इंग्लंडच्या आशांवर पाणी फेरले. इंग्लंड संघ अजूनही १५६ धावा मागे आहे आणि त्यांनी ५ विकेट्स गमावल्या आहेत.