IND vs ENG ODI Series Jos Buttler vs Hardik Pandya Rivalry : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने शानदार गोलंदाजी करताना पाहुण्या इंग्लंड संघाला ४९.५ षटकांत सर्वबाद ३०४ धावांवर रोखले. दरम्यान या सामन्यात भारताने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरची शिकार करत, जो रुटसोबत होत असलेली महत्त्वपूर्ण भागीदारी संपुष्टात आणली.ज्यामुळे इंग्लंडला एक मोठी धावंसख्या उभारण्यापासून रोखण्यात यश मिळाले.
या गोलंदाजासमोर बटलर पुन्हा एकदा ठरला अपयशी –
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठी खेळी खेळण्यास मुकला. त्याने ३५ चेंडूत ३४ धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन चौकारही मारले. या डावात तो चांगल्या टचमध्येही दिसला. पण हार्दिक पंड्याच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तो झेलबाद झाला. त्याचा झेल भारताचा उपकर्णधार शुबमन गिलने टिपला. विशेष म्हणजे हार्दिकविरुद्ध बटलरचा रेकॉर्डही काही खास राहिलेला नाही. हार्दिकविरुद्ध खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ९ डावांमध्ये ८८ चेंडूंचा सामना केला आहे.
या काळात तो फक्त ६३ धावा करू शकला आणि ४ वेळा बाद झाला आहे. त्याची सरासरी १५.७५ आहे आणि स्ट्राईक रेट ७१.५९ आहे. अशा परिस्थितीत, बटलरला हार्दिक पंड्याचा सामना करणे कठीण जात आहे, हे स्पष्ट आहे. या सामन्यात भारतासाठी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फिल साल्ट आणि डकेट यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. डकेटने ६५ धावा केल्या, तर काही काळापासून एकदिवसीय सामन्यांमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या जो रूटने ६९ धावांची खेळी साकारली.
भारताला ३०५ धावांचे लक्ष्य –
रूट आणि डकेट व्यतिरिक्त, लियाम लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या ज्यामुळे संघ आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला. सुरुवातीला, इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना खूप त्रास दिला, परंतु शेवटी त्यांच्या विकेट्स पडत राहिल्या आणि भारताला धावगती नियंत्रित करण्यात यश आले. परंतु, असे असूनही, इंग्लंड संघाने ३०० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले. इंग्लंडकडून सॉल्टने २६, हॅरी ब्रुकने ३१, कर्णधार जोस बटलरने ३४, आदिल रशीदने १४, जेमी ओव्हरटनने सहा आणि गस अॅटकिन्सनने तीन धावा केल्या. भारताकडून जडेजा व्यतिरिक्त मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पंड्या आणि नवोदित वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.