भारतीय कसोटी संघातील काही खेळाडू आज (१६ जून) इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले आहेत. उर्वरित खेळाडूदेखील लवकरच इंग्लंडला जाणार आहेत. यादरम्यान, भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. सलामीवीर आणि कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केएल राहुलला उपचारासाठी परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला जर्मनीला पाठवण्याची तयारी केली जात असल्याचे वृत्त आहे.
भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यावर एकूण सात सामने खेळायचे आहेत. इंग्लंडमध्ये भारतीय संघ १ ते ५ जुलै दरम्यान एक कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर तीन टी २० आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार आणि केएल राहुलला उपकर्णधार करण्यात आले होते. मात्र, दुखापतीमुळे राहुल इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आता त्याच्या अनुपस्थितीत भारतीय निवड समितीला उपकर्णधारपदासाठी दुसऱ्या नावाचा विचार करावा लागणार आहे.
क्रिकबझने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने केएल राहुलला उपचारासाठी परदेशात पाठवण्याचा विचार केला आहे. क्रिकबझने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘हे खरे आहे. बोर्ड त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. तो लवकरच जर्मनीला जाणार आहे.’ केएल राहुल या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला जर्मनीला जाण्याची शक्यता आहे.
कर्नाटक आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असलेल्या राहुलने आतापर्यंत ४३ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि ५६ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यावर्षी फेब्रुवारीपासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच त्याच्या दुखापतीने डोके वरती काढले. त्यामुळे त्याला पाच सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले.