IND vs ENG Virat Kohli Liam Livingstone Banter video: भारताच्या निर्भेळ मालिका विजयासह तिसऱ्या वनडेदरम्यान अजून एक चांगली बातमी आली ती म्हणजे रोहित शर्मानंतर विराट कोहलीही आपल्या फॉर्मात परतला. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने शानदार फलंदाजी केली आणि ५५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने एकूण ५२ धावा केल्या. विराटने ९४.५५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. विराटच्या या खेळीदरम्यान तो आदिल रशीदच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण त्यापूर्वी कोहली आणि लिव्हिंगस्टोन यांच्यातील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
विराट कोहली पुन्हा एकदा इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. आदिल रशीदने विराट कोहलीला वनडेमध्ये ५ वेळा तर तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ११ वेळा बाद केलं आहे. पण विराटने आदिल रशीदच्या षटकातील काही चेंडूंवर चांगली फलंदाजीदेखील केली. पण विराट बाद होण्यापूर्वी आदिल रशीदच्या गोलंदाजीवर तो बाद आहे का हे पाहण्यासाठी रिव्ह्यूदेखील घेण्यात आला होता.
विराट कोहली आणि लिव्हिंगस्टोनमध्ये नेमकं काय घडलं?
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदने कोहलीला चेंडू टाकला, त्यावर एलबीडब्ल्यूचे अपील करण्यात आले. चेंडू लेग स्टंप लाइनच्या बाहेर होता, त्यामुळे विराट बाद आहे असं वाटत होते. पण विराट थोडक्यासाठी बचावला. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन विराट कोहलीकडे आला आणि तू जरासाठी वाचलास असं त्याला हातवारे करत मस्करीत म्हणाला आणि या दोन्ही खेळाडूंमध्ये मजा मस्तीचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. ज्यात दोघे एकमेकांना धक्काही देत होते.
लिव्हिंगस्टोनने विराट कोहलीला टक्कर मारत पॅव्हेलियनमध्ये जाण्यासही सांगितले. दरम्यान, विराट कोहलीनेही त्याला मस्करीत काहीतर बोलत धक्का मारत दोघांमध्ये मजा मस्ती पाहायला मिळाली. महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही खेळाडू आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीकडून खेळणार आहेत. लिव्हिंगस्टोनला या हंगामासाठी आरसीबीने आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
Virat Kohli and Liam Livingstone pic.twitter.com/YOANKn4aJt
— Spycricket24x7 (@Spycricket1) February 12, 2025
विराट कोहली १९व्या षटकात आदिल रशीदच्या चेंडूवर बाद झाला. त्याचा झेल फिल सॉल्टने घेतला. चांगली सुरुवात आणि अर्धशतक केल्यानंतर कोहली मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. आदिल रशीदने विराट कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवण्याची ही ५वी वेळ आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीसाठी ही खेळी खूप महत्त्वाची होती.