IND vs ENG ODI Series Shubman Gill Press Conference : युवा फलंदाज शुबमन गिलला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. गेल्या वर्षी संघाला एकही वनडे सामना जिंकता आला नव्हता. २०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतीय संघाला पुन्हा एकदा वनडेत वर्चस्व गाजवायचे आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी शुबमन गिलने उपकर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल सांगताना रोहित शर्मासह अभिषेक-यशस्वीबाबत ही प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपकर्णधारपदाच्या जबाबदारीवर शुबमन गिल काय म्हणाला?

शुबमन गिलचा संघाच्या नेतृत्व गटात समावेश करण्यात आला आहे. उपकर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना गिल म्हणाला, “मी माझ्या कामगिरीसह नेतृत्व करणे हे आव्हान म्हणून स्वीकारतो. त्याचबरोबर जर मैदानावर रोहित शर्माला झे मत हवे असेल तर मी माझे मत मांडेन. मला जे वाटते ते त्यांना सांगण्याची जबाबदारी माझी आहे. एक मालिका संपूर्ण संघाचे स्वरूप परिभाषित करत नाही. अनेक मालिका आणि स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू आहेत.”

रोहित शर्माच्या फॉर्मचा बचाव केला –

भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. न्यूझीलंड मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची बॅट शांत राहिली. त्यानंतर रणजी ट्रॉफीच्या एकाही सामन्यात त्याची बॅट तळपली नाही. रोहितबद्दल गिल म्हणाला, “गेल्या दीड वर्षांपासून रोहित ज्या पद्धतीने वनडेमध्ये फलंदाजी करत आहे, त्यामुळे आमच्यासाठी सामन्याचा मार्ग बदलत आहे. तो सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या संघाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांच्यासोबत फलंदाजी करणाऱ्यांवर आणि नंतर फलंदाजीला येणाऱ्यांवरचा दबाव कमी होतो. यामुळे संघाला खूप मदत होते.”

अभिषेक-यशस्वीबद्दल शुबमन काय म्हणाला?

अभिषेक आणि यशस्वीबद्दल बोलताना शुबमन गिल म्हणाला, “अभिषेक माझा बालपणीचा मित्र आहे. जैस्वालही माझा मित्र आहे. मला वाटत नाही की आमच्यात स्पर्धा आहे. साहजिकच, जर तुम्ही देशासाठी खेळत असाल, तर तुम्हाला प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करायची असते. तुम्ही असा विचार करु शकत नाही की, कदाचित या मुलाने चांगली कामगिरी करायला नको होती. तुम्ही देशासाठी आणि संघासाठी खेळत आहात आणि जो चांगली कामगिरी करतो, तुम्हाला त्याच्यासाठी चांगले वाटते, तुम्ही त्याचे अभिनंदन करता.”

शुबमन गिल हा भारतीय संघाचा एकदिवसीय क्रिकेटमधील आघाडीचा फलंदाज आहे. आतापर्यंत ४७ सामन्यांच्या कारकिर्दीत तो ५८ च्या सरासरीने धावा करत आहे. त्याच्या नावावर ६ शतकांच्या मदतीने २३२८ धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक द्विशतकही झळकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng odi shubman gill statement opens up on vice captaincy role defends rohit sharma form vbm