R Ashwin and Jonny Bairstow 100th Test Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आजपासून धरमशाला येथे खेळला जात आहे. भारताचा रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यांच्यासाठी हा सामना खूप खास आहे. दोघांचा हा १०० वा कसोटी सामना आहे. इंग्लंडने बुधवारीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आणि त्यात बेअरस्टोचा समावेश केला होता.
त्याचवेळी आज नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आणि अपेक्षेप्रमाणे अश्विन संधी मिळाली. अश्विन आणि बेअरस्टो या दोघांनी एकाच सामन्यात त्याच्या १०० व्या कसोटी सामना खेळायला उतरल्याने एक विशेष विक्रम निर्माण झाला आहे. दोघांनी विशेष कामगिरी केली आहे.
कसोटी इतिहासात हे चौथ्यांदा घडले –
दोन किंवा अधिक खेळाडू एकत्र येऊन १०० वा सामना खेळण्याची ही चौथी वेळ आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल अथर्टन आणि ॲलेक स्टीवर्ट यांनी २००० मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली तेव्हा पहिल्यांदाच असे घडले. तसेच दक्षिण आफ्रिकेचे जॅक कॅलिस, शॉन पोलॉक आणि न्यूझीलंडचे स्टीफन फ्लेमिंग हे तिन्ही महान खेळाडू आपला १०० वा कसोटी सामना एकत्र खेळले होते. हे तिघेही २००६ मध्ये सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात सहभागी झाले होते.
दुसऱ्यांदा विरोधी संघातील दोन खेळाडूंची शंभरवी कसोटी –
पर्थ येथे २०१३ च्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲशेस सामन्यात, इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांनी त्यांचा १०० वा कसोटी सामना एकत्र खेळला होता. अश्विन आणि बेअरस्टो हे गुरुवारी भारत विरुद्ध इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि यादीत चौथ्या स्थानावर आहेत. तथापि, कूक-क्लार्कनंतर ही दुसरी वेळ आहे की एकाच सामन्यात विरोधी संघातील दोन खेळाडू त्यांची १०० वी कसोटी खेळत आहेत.