Sachin Tendulkar on Ravichandran Ashwin 500 Test Wickets Complete : रविचंद्नन अश्विनने राजकोटमध्ये जॅक क्रॉलीला बाद करून इतिहास रचला. वास्तविक, रवी अश्विनने कसोटीत ५०० विकेट्सचा पल्ला पार केला. रवी अश्विन कसोटीत ५०० विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. तसेच जगातील नववा गोलंदाज ठरला. रविचंद्रन अश्विनच्या आधी भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने ५०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. मात्र, अश्विनने अवघ्या ९८ कसोटी सामन्यात ५०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यानंतर सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी अश्विनचे सोशल मीडियावरुन कौतुक केले आहे.
३७ वर्षीय अश्विनला या सामन्यापूर्वी ही कामगिरी करण्यासाठी केवळ एका विकेटची गरज होती. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज जॅक क्रॉलीने चेंडू स्वीप करण्याच्या प्रयत्न केला, पण तो चेंडू हवेत उडाला आणि रजत पाटीदारने शॉर्ट फाइन लेगवर सोपा झेल घेतला. अश्विनने ५०० विकेट घेतल्यावर सचिन तेंडुलकरने त्याचे कौतुक केले.
सचिन तेंडुलकरने अश्विनच्या ५०० कसोटी विकेट्स पूर्ण झाल्यानंतर एक्सवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहले, “लाखातील एका गोलंदाजाचे ५०० कसोटी विकेट्स. अश्विन हा नेहमीच एक विजेता आहे. ५०० विकेट्स हा कसोटी क्रिकेटमधील एक मोठा मैलाचा दगड आहे. अभिनंदन, चॅम्पियन.” त्याचबरोबर इतरही अनेक दिग्गजांनी अश्विनच्या या पराक्रमाची प्रशंसा केली.
अश्विनच्या पराक्रमावर दिग्गज काय म्हणाले?
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
८०० – मुथय्या मुरलीधरन
७०८ – शेन वॉर्न
६९६ – जेम्स अँडरसन
६१९ – अनिल कुंबळे
६०४ – स्टुअर्ट ब्रॉड
५६३ – ग्लेन मॅकग्रा
५१९ – कोर्टनी वॉल्श
५१७ – नॅथन लायन
५०० – रविचंद्रन अश्विन
रविचंद्रन अश्विनची कसोटीतील कामगिरी –
अश्विनच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली, तर या गोलंदाजाने ९८ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. रवी अश्विनने कसोटी सामन्यात ५०० विकेट्स घेतल्या आहेत. रवी अश्विनने कसोटी सामन्यात २३.८९ च्या सरासरीने आणि ५१.४५ च्या स्ट्राईक रेटने विकेट्स घेतल्या आहेत. या भारतीय दिग्गज खेळाडूने कसोटी सामन्यात ३४ वेळा एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय त्याने ८ वेळा सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.