IND vs ENG Ravindra Jadeja surpasses Anil Kumble : कटकमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या इंग्लंडला ३०४ धावांवर रोखले. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक ६९ धावा केल्या तर सलामीवीर बेन डकेटने ६५ धावा केल्या. इंग्लंड संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि त्यांना ४९.५ षटकांपर्यंत आटोपला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ विकेट्स घेत अनिल कुंबळेचा मोठा विक्रम मोडला.
रवींद्र जडेजाने कुंबळेला टाकले मागे –
रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा भारताकडून शानदार गोलंदाजी केली आणि १० षटकांच्या कोट्यात ३५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे जडेजाने एकदिवसीय सामन्यात मोठी कामगिरी केली. रवींद्र जडेजाने बेन डकेट, जो रूट आणि जेमी ओव्हरटनला बाद केले. यासह, जडेजाने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा अनिल कुंबळेचा मोठा विक्रम मोडला. जडेजा आता इंग्लंडविरुद्ध भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
या बाबतीत अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. अश्विनने तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध १५० विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जडेजाच्या नावावर ११९ विकेट्स आहेत. अनिल कुंबळेने इंग्लंडविरुद्ध ११७ विकेट्स घेतल्या आहेत. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजानेही ३ विकेट्स घेतल्या होत्या. या काळात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम केला. आता सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने आणखी एक मोठा पराक्रम केला आहे.
इंग्लंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज :
१५० – रविचंद्रन अश्विन<br>११९ – रवींद्र जडेजा*
११७ – अनिल कुंबळे
११३ – कपिल देव