IND vs ENG India beat England by 4 Wickets in 2nd ODI : कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला. यासह, टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी अभेद्या आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो रोहित शर्मा राहिले, ज्याने ९० चेंडूत ११९ धावांची शानदार आणि संस्मरणीय खेळी केली. त्याच्याशिवाय शुबमन गिलनेही अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने ही गोलंदाजीत ३ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. यासह भारताने सलग सातव्यांदा मालिका विजय नोंदवला.
कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने बेन डकेट आणि जो रूट यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४९.५ षटकांत १० गडी गमावून ३०४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने ४४.३ षटकांत सहा गडी गमावून ३०८ धावा केल्या आणि सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली.रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली, जी जेमी ओव्हरटनने तोडली.
विराट कोहली पुन्हा अपयशी –
ओव्हरटनने १७ व्या षटकात युवा फलंदाज गिलला बाद केले. २५ वर्षीय फलंदाज ५२ चेंडूत ६० धावा काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. गिलने ४५ चेंडूत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक पूर्ण केले.तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला विराट कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला. आदिल रशीदने त्याला आपला बळी बनवले. तो फक्त पाच धावा करू शकला.
तिसऱ्या विकेटसाठी हिटमॅनसोबत ७० धावांची भागीदारी –
यानंतर श्रेयस अय्यरने पदभार स्वीकारला. त्याने तिसऱ्या विकेटसाठी हिटमॅनसोबत ७० धावांची भागीदारी केली. यादरम्यान, भारतीय कर्णधाराने ७६ चेंडूत त्याचे ३२ वे शतक पूर्ण केले. तो ९० चेंडूत १२ चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने ११९ धावांची शानदार खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. डावाच्या ३० व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर आदिल रशीदने त्याला झेलबाद केले.
इंग्लंडविरुद्ध, श्रेयस अय्यरने ४४, हार्दिक पंड्याने १०, अक्षर पटेलने नाबाद ४१ आणि रवींद्र जडेजाने ११ धावा केल्या. इंग्लंडकडून जेमी ओव्हरटनने दोन तर गस अॅटकिन्सन, आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी एक विकेट घेतली. आता दोन्ही संघांमधील तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडला विजयासह व्हाईटवॉश करण्याच्या उद्दिष्टाने मैदानात प्रवेश करेल.