Sarfaraz Khan Selection in Indian Team : सरफराज खानला अखेर देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले. इंग्लंडविरुद्ध २ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुलच्या दुखापतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोघेही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत.
सरफराजने अलीकडच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करतानाही त्याने चमकदार फलंदाजी केली आहे. सर्फराजचे वडील नौशाद खान यांनी आपला मुलगा भारतीय संघात निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सरफराजला पाठिंबा दर्शविल्याबद्दल निवडकर्त्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले. सरफराजचा धाकटा भाऊ मुशीर खानने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
नौशाद खान म्हणाले, “तुम्हा सर्वांना माहित आहे की, सरफराजची भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. विशेषतः मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जिथे तो मोठा झाला. तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) जिथे त्याला अनुभव मिळाला, बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या सर्व चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला पाठिंबा दिला. तो देशासाठी चांगला खेळून संघाच्या विजयात हातभार लावेल, अशी आम्हा सर्वांना आशा आहे.”
हेही वाचा – Deepti Sharma : क्रिकेटपटू दीप्ती शर्माचा गौरव; योगी सरकारकडून पोलीस दलातील ‘हे’ पद बहाल
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरव कुमार.