उद्यापासून म्हणजेच गुरुवार १२ ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे. या मॅचमध्ये भारताचा ऑलराऊंडर बॉलर शार्दूल ठाकूर खेळणार की नाही? यावरून गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. शार्दूल ठाकूर उद्यापासून सुरू होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये खेळणार नाही, असं विराट कोहलीनं जाहीर केलं आहे. तसेच, भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये नेमकं कोण कोण असणार आहे आणि उद्याच्या अंतिम संघात आर. अश्विनचा तरी समावेश असेल की नाही, हे उद्या सकाळीच नक्की होऊ शकेल, असं देखील विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे.

तिसऱ्या कसोटीपर्यंत शार्दूल फिट होणार!

डाव्या गुडघ्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या स्नायूमध्ये अर्थात हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत झाल्यामुळे शार्दूल ठाकूरच्या खेळण्याविषयी शंका निर्माण झाली होती. अखेर कर्णधार विराट कोहलीनंच त्यावर पडदा टाकला असून शार्दूल ठाकूर दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, शार्दूल तिसऱ्या कसोटीपर्यंत बरा होईल आणि तिसऱ्या कसोटीसाठी तो फिट असेल, असं देखील विराट कोहलीनं सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब ठरली आहे.

“सचिन खाली पडला आणि मला वाटलं की आता मी मेलो”, शोएब अख्तरनं सांगितली ‘ती’ आठवण!

अश्विन की इशांत शर्मा?

एकीकडे शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्यामुळे आता अश्विन की इशांत शर्मा यावर टीम इंडिया व्यवस्थापनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. उद्या लॉर्ड्सवर वातावरण आणि खेळपट्टी कशी असेल, त्यावरून आर अश्विन की इशांत शर्मा, यावर निर्णय घेतला जाणार आहे. आत्तापर्यंत खेळपट्टी ही कोरडीच राहिल्यामुळे आणि लॉर्ड्सवर गेल्या काही दिवसांमध्ये पाऊसही पडला नसल्यामुळे खेळपट्टीमध्ये आर्द्रता देखील असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आर अश्विन उद्याच्या सामन्यातून टेस्टमध्ये कमबॅक करण्याची शक्यता आहे, असं वृत्त इनसाईड स्पोर्ट्सनं दिलं आहे.

Story img Loader