India vs England, World Cup 2023: रविवारी लखनऊ येथील एकाना स्टेडियमवर झालेल्या कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा उडवत विश्वचषक स्पर्धेत सलग सहावा विजय नोंदवला. या विजयासह रोहित शर्मा अँड कंपनीने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. भारताच्या खात्यात १२ गुण झाले असून त्यांचा निव्वळ रनरेट हा +१.४०५ इतका आहे. एकाना क्रिकेट स्टेडियमवर विजयासाठी २३० धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३४.५ षटकांत १२९ धावांत गडगडला. त्यांचा सहा सामन्यांतील हा पाचवा पराभव आहे. भारताने आतापर्यंत सहा सामने जिंकले असून उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहिद आफ्रिदीने भारताचे केले कौतुक

भारताच्या विजयावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने संघाचे आणि खेळाडूंचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, “भारतीय संघ या विश्वचषकात खूप बलाढ्य दिसत आहे. काही चुकीच्या गोष्टी झाल्या तरीही त्यांनी यावर मात केली आहे. त्यांनी त्यांच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे, असे दिसते. सर्वात मोठ्या विश्वचषकासारख्या टूर्नामेंटमध्ये सहा पैकी सहा सामने जिंकणे ही खूप मोठी कामगिरी आहे. शारीरिक मेहनत आणि मानसिक ताकदीचा हा पुरावा टीम इंडियाने दिला आहे. जरी त्यांच्यासाठी हे वातावरण ओळखीचे असले तरी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणे ही साधी गोष्ट नाही, म्हणूनच ते या कारणामुळे विश्वचषक २०२३मध्ये फेव्हरेट आहे.”

हेही वाचा: IND vs ENG: “आम्ही याहून चांगले…”, इंग्लंडवर विजय मिळवूनही रोहित शर्मा का आहे नाराज? जाणून घ्या

शोएब अख्तरने इंग्लंडवर निशाणा साधला

दुसरीकडे, त्याचवेळी ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही टीम इंडियाचे कौतुक केले आहे. त्याने इंग्लंड संघ आणि बॅझबॉल क्रिकेटवरही निशाणा साधला आहे. त्याने इंग्लंडच्या कार्यपद्धतीवर टीका केली की, “ते एकदिवसीय प्रकारात टी२० क्रिकेट शैली समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही एक खूप मोठी चूक आहे.”

इंग्लंडच्या बाहेर पडल्याने अख्तर दु:खी आहे- अख्तर

अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “भारताने इंग्लंडचा दारूण पराभव केला आहे. इंग्लंडचा हा विश्वचषक खूप वाईट गेला आहे. त्यांचा हा पाचवा पराभव असून ते १०व्या क्रमांकावर आहेत कारण, हे इंग्लिश क्रिकेटर टी२० क्रिकेटसारखे एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत आहेत. डावाचे नेतृत्व कोण करणार, कोण स्ट्राईक रोटेट करणार, कोण एकेरी-दुहेरी धाव घेणार, कोण मोठे फटके मारणार, याचे कोणतेही नियोजन नाही.” विश्वचषकातून इंग्लंड बाहेर पडल्याबद्दलही अख्तरने दुःख व्यक्त केले. तो म्हणाला, “इंग्लंडला वर्ल्डकपमधून बाहेर पडताना पाहून मला खूप वाईट वाटत आहे. कसोटी सामन्यांमध्ये बॅझबॉल ठीक आहे, पण तुम्हाला एकदिवसीयमध्ये तसेच खेळावे लागेल जसे भारत खेळत आहे.”

हेही वाचा: IND vs ENG: पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम शमी-बुमराहच्या गोलंदाजीने झाला प्रभावित; म्हणाला, “मी त्यांच्या तुलनेत…”

बॅझबॉल क्रिकेट म्हणजे काय?

इंग्लंडचे कसोटी प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नावावरून ‘बॅझबॉल क्रिकेट’ हे नाव देण्यात आले आहे. मॅक्क्युलम जेव्हापासून इंग्लिश संघाचा कसोटी प्रशिक्षक झाला, तेव्हापासून त्याने या संघात एक नवी ऊर्जा भरली होती आणि त्यामुळेच कसोटीत चौथ्या डावात कोणतीही मोठी धावसंख्या गाठण्यात संघाला यश आले. हीच शैली अंगीकारत त्याने विश्वचषकापूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारली, पण या स्पर्धेत त्यांची ही शैली चालली नाही. आता गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. गुणतालिकेत तळाशी असलेल्या इंग्लंडचा संघ शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng shahid afridi praised india shoaib akhtar slammed england and baseball cricket avw