Shubman Gill missed his fourth Test century: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल शानदार फलंदाजी करत होता. मात्र, अवघ्या ९ धावांनी त्याचे शतक हुकले. त्याने १५१ चेंडूचा सामना करताना ९१ धावा केल्या. या खेळीत त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. त्याने मागील सामन्यात शतकी खेळी साकारली होती.
टीम इंडियाला २४६ धावांवर तिसरा धक्का बसला. शुबमन गिल ९१ धावा करून धावबाद झाला. कुलदीपने मिड ऑनला एक शॉट खेळला. यानंतर धाव घेण्यासाठी आलेला शुबमन अर्ध्या क्रीजवर पोहोचला होता. त्यानंतर स्टोक्सच्या थ्रोवर हार्टलीने शुबमनला धावबाद केले. सध्या यशस्वी जैस्वाल कुलदीपला साथ देण्यासाठी मैदानात आला आहे. यशस्वी शनिवारी रिटायर्ड हर्ट झाला होता.
कुलदीपची चूक, शुबमनला शिक्षा –
सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर रजत पाटीदार बाद झाल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कुलदीप यादवला नाईट वॉचमन म्हणून मैदानात उतरवले होते. सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने शुबमन गिलच्या साथीने ही भागीदारी ५० धावांच्या पुढे नेली. मोठा फटका मारल्यानंतर तो चेंडूकडे पाहत राहिला आणि शुबमन गिल पुढे धावला आणि परतण्यात अपयशी ठरला.
हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! रविचंद्रन अश्विन आज पुन्हा भारतीय संघात सामील होणार
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी –
आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिसऱ्या दिवशी अचानक चेन्नईला परतलेला रविचंद्रन अश्विन आज पुन्हा संघात दाखल होणार आहे. बीसीसीआयने याला दुजोरा दिला आहे. इंग्लंडसाठी ही वाईट बातमी आहे. अश्विन नसताना इंग्लिश संघाने शनिवारी उर्वरित आठ विकेट ११२ धावांत गमावल्या होत्य. अशा स्थितीत अश्विनसारख्या चॅम्पियन गोलंदाजाच्या पुनरागमनामुळे इंग्लिश कॅम्प नक्कीच अडचणीत येईल. त्याच्या आगमनाने भारताची फलंदाजीही मजबूत होणार आहे.