India New Batting Coach IND vs ENG: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरूद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळणार आहे. येत्या २२ जानेवारीपासून टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघात नवे फलंदाजी प्रशिक्षकही संघाबरोबर असणार आहेत. या मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआयने नवे फलंदाजी प्रशिक्षक नेमले आहेत.
सौराष्ट्राचे अष्टपैलू खेळाडू सितांशु कोटक यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयने निवड केली आहे. सितांशु कोटक यांनीही एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, पण त्यांचा कोचिंगचा अनुभव चांगला आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.
हेही वाचा – IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “सितांशू कोटक टीम इंडियात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील होणार आहेत. भारतीय संघाचे कोलकात्यात तीन दिवसीय शिबिर होणार असून त्यासाठी खेळाडू १८ तारखेपर्यंत तेथे पोहोचतील.” भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सध्या मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, अभिषेक नायर (सहाय्यक प्रशिक्षक), रायन टेन डोशेट (सहाय्यक प्रशिक्षक), मोर्ने मॉर्केल (गोलंदाजी प्रशिक्षक) आणि टी दिलीप (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) आहेत.
कोण आहेत सितांशु कोटक?
गुजरातमध्ये जन्मलेल्या कोटक यांनी आपल्या कारकिर्दीत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यांनी लिस्ट ए सामन्यांमध्ये ४२.३३ च्या सरासरीने ३०८३ धावा केल्या आहेत. क्रिकेट जगतात ते त्यांच्या उत्कृष्ट टेक्निकसाठी ओळखले जातात. १३० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी ४१.7७६ च्या सरासरीने ८०६१ धावा केल्या आहेत, ज्यात त्यांनी १५ शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा – IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
कोटक यांच्या नावावर ९ टी-२० सामन्यात १३३ धावा आहेत. कोटक यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ११ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. कोटक यांनी यापूर्वी इंडिया ए संघासह काम केलं आहे. त्यांनी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या सपोर्ट स्टाफसह काम केलं आहे.
सितांशु कोटक यांचा कोचिंगचा अनुभव
सितांशु कोटक यांचा कोचिंगचा अनुभव तगडा आहे. २०२० च्या रणजी ट्रॉफीमध्ये सितांशु हे सौराष्ट्रचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यांचा संघ चॅम्पियनही झाला होता. २०१९ मध्ये राहुल द्रविड यांची जागा घेणारी व्यक्ती म्हणजे सितांशु कोटक. २०१९ मध्ये, जेव्हा राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख बनले, तेव्हा भारत अ संघाच्या प्रशिक्षका पदाची जबाबदारी सितांशु कोटक यांच्याकडे आली. आता भारताच्या वरिष्ठ संघात सितांशु कोटक यांचा समावेश झाला आहे.