IND vs ENG ODI Series: भारत वि इंग्लंड वनडे मालिका भारतात उद्या म्हणजेच ६ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये तर दुसरा सामना कटकमध्ये खेळवला जाणार आहे. डिसेंबर २०१९ नंतर प्रथमच कटकमध्ये एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. कदाचित याच कारणामुळे कटक स्टेडियमबाहेर भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची ऑफलाइन तिकिटं मिळविण्यासाठी हजारो चाहत्यांची गर्दी जमली होती आणि त्यात चेंगराचेंगरी देखील झाली.

कटक, ओडिशातील बाराबती स्टेडियमबाहेर क्रिकेट चाहत्यांनी गोंधळ गातला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायली आणि त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. काही लोक तर बेशुद्धदेखील झाले, तर काही लोक गर्दीच्या तिकीट काउंटरमध्ये धडपड करत होते.

गर्दीवर नियंत्रण न राहिल्याने मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला, स्थानिकांनी प्रशासनावर चुकीचे नियोजन आणि अपुऱ्या सुविधांमुळे अशी घटना घडल्याचा आरोप केला. निराश चाहत्यांनी पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि जाण्यायेण्याचा योग्य मार्ग तयार केले नसल्याची टीका केली, ज्यामुळे तणाव वाढल्याने परिस्थिती आणखी वाईट झाली.

टीम इंडियाच्या या सामन्याची तिकिटे काढण्यासाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने स्टेडियमवर पोहोचले होते. मात्र काही चाहते तिकिटासाठी काउंटरवर चढू लागले, त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. या सर्व प्रकारामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रचंड गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जसह पाण्याच्या तोफांचा अवलंब करावा लागला.

मंगळवारी रात्रीपासूनच हजारो क्रिकेट रसिक आपल्याला तिकिट मिळावं या आशेने स्टेडियमजवळ जमू लागले. बुधवारी पहाटेपर्यंत लांबलचक रांगा लागल्या होत्या, काही चाहत्यांनी तर आवडत्या क्रिकेटपटूंना खेळताना पाहण्याची संधी गमावू नये यासाठी रात्रबाहेर घराबाहेर होते. बुधवारी सकाळी ९ वाजता ऑफलाइन तिकीट विक्री सुरू झाली, तेव्हा गर्दी झपाट्याने उफाळून आली. तिकीट उपलब्ध असल्याची माहिती पसरताच, परिस्थिती आणखी बिघडली. तिकीट विक्री नीट न झाल्याने अनेक स्थानिक प्रसारमाध्यमांनी ओडिशा क्रिकेट असोसिएशनवर टीका केली. या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांना भोवळ आल्याची तर काही जण जखमी झाल्याची माहितीदेखील येत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना अनेक वर्षांनंतर कटकमध्ये खेळवला जाणार आहे. बाराबती स्टेडियमवरील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामना होता. त्याचवेळी, विराट कोहली आणि रोहित शर्मा बाराबती स्टेडियमवर खेळण्याची ही गेल्या पाच वर्षांतील पहिलीच वेळ आहे. या दोन स्टार खेळाडूंनी शेवटचा एकदिवसीय सामना २०१९ मध्ये कटक येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता, जेव्हा कोहलीला भारताच्या विजयाचा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.

Story img Loader