भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या एजबस्टन कसोटी सामन्यातील दुसरा दिवस स्टुअर्ट ब्रॉडसाठी संस्मरणीय ठरला. एकाच दिवशी आणि अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने त्याने दोन चांगले-वाईट विक्रम आपल्या नावे केले. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने ब्रॉडच्या एकाच षटकामध्ये ३५ धावा फटकावून कसोटी क्रिकेटमधील जागतिक विक्रम केला. परिणामी, कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वात जास्त धावा देण्याचा विक्रम ब्रॉडच्या नावे नोंदवला गेला. मात्र, असे असले तरी त्याने आज आणखी एक कामगिरी केली आहे. स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत ५५० बळींचा टप्पा गाठला.

मोहम्मद शामी हा ब्रॉडचा ५५०वा बळी ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये ५५० बळी घेणारा तो जगातील सहावा आणि इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. ब्रॉडच्या अगोदर जेम्स अँडरसनने अशी कामगिरी केलेली आहे. अँडरसनने कसोटीमध्ये ६५६ बळी मिळवलेले आहेत. ब्रॉडच्या पूर्वी मुथैया मुरलीधरन (श्रीलंका-८००), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया-७०८), जेम्स एंडरसन (इंग्लंड-६५७), अनिल कुंबले (भारत-६१९) आणि ग्लेन मैकग्राथ (ऑस्ट्रेलिया-५६३) या खेळाडूंनी ५०० कसोटी बळींचा टप्पा ओलांडलेला आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने २००७ साली श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडकडून पहिला कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने चामिंडा वासला बाद करून आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिला बळी मिळवला होता.

हेही वाचा – VIDEO: क्रिकेट सोडून ‘हे’ भारतीय खेळाडू उडवत बसले चिमण्या आणि मैना!

स्टुअर्ट ब्रॉड हा कसोटी क्रिकेटमध्ये एक नव्हे तर दोन हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम करणाऱ्या मोजक्या गोलंदाजांपैकी एक आहे. २०११ मध्ये त्याने भारताविरुद्धच्या नॉटिंगहॅम कसोटीत पहिली हॅट्ट्रिक मिळवली होती. त्यावेळी त्याने एमएस धोनी, हरभजन सिंग आणि प्रवीण कुमार यांना बाद केले होते. तर, त्याची दुसरी हॅटट्रिक श्रीलंकेविरुद्ध घेतली होती. त्याने कुमार संगकारा, दिनेश चंडिमल आणि शमिंदा एरंगा यांना बाद केले होते.

याशिवाय, स्टुअर्ट ब्रॉड हा कसोटी क्रिकेटमध्ये ५५० बळी आणि शतक करणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. २०१० मध्ये त्याने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या २९७ चेंडूंचा सामना करून १६९ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.

Story img Loader