Sunil Gavaskar wants Rohit should let Ashwin lead in fifth Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचवा कसोटी सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आर अश्विनसाठी एक खास मागणी केली आहे. सुनील गावसकरांच्या मते भारतीय कर्णधार रोहित शर्माने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यासाठी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संधी द्यावी, ज्याचा १०० वा कसोटी सामना आहे.
धरमशाला येथे अश्विनला कर्णधारपदाची संधी मिळावी –
रविचंद्रन अश्विन सध्या रांचीमध्ये ९९ वा कसोटी सामना खेळत आहे. या ३७ वर्षीय गोलंदाजाने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ५१ धावांत 5 बळी घेतले. एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची अश्विनची ही ३५वी वेळ आहे. रविवारी जियो सिनेमावर अश्विनशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, ‘उद्या भारत जिंकेल आणि त्यानंतर संघ पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी धर्मशालाला जाईल. मला विश्वास आहे की,
रोहित तुम्हाला या मैदानावर संघाचे नेतृत्व करण्याची संधी देईल. भारतीय क्रिकेटसाठी तुम्ही जे काही केले आहे ते लक्षात घेता हा एक उत्कृष्ट सन्मान असेल.’
अश्विनने काय दिली प्रतिक्रिया –
प्रत्युत्तरादाखल अश्विनने सांगितले की, तो संघात जितका जास्त काळ टिकेल तितके त्याच्यासाठी चांगले होईल. अश्विन म्हणाला, ‘सनी भाई तुमचे मन खूप उदार आहे. याबद्दल धन्यवाद. परंतु मला वाटतं की मी या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलो आहे. मी या टीमसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. हे जितका जास्त काळ टिकेल तितका मला आनंद होईल.’
हेही वाचा – VIDEO : ‘काही सेकंद बाकी, सर्वांनी डोकं लावा…’, डीआरएसबाबत रोहित शर्मा गोंधळला, शेवटच्या क्षणी घेतला निर्णय
अश्विनच्या कसोटी क्रिकेटमध्ये ५०७ विकेट्स –
रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ९९ कसोटी सामन्यांमध्ये ५०७ बळी घेतले आहेत. अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून ६१९ विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुथय्या मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० बळी घेतले आहेत. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, रविचंद्रन अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ३५ वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनला (०) बाद करून ही कामगिरी केली.
भारत मालिका विजयाच्या जवळ –
अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या ९ विकेट्सच्या जोरावर भारताने रांची येथील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रविवारी इंग्लंडला दुसऱ्या डावात १४५ धावांत गुंडाळले. यानंतर १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता ४० धावा करत आपला वरचष्मा कायम ठेवला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा २४ धावांवर खेळत होता, तर त्याचा सहकारी सलामीवीर यशस्वी जैस्वाल १६ धावांवर खेळत होता. भारताला आता विजयासाठी १५२ धावांची गरज असून सर्व १० विकेट्स शिल्लक आहेत. या डावात रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार धावाही पूर्ण केल्या.