भारतीय संघाचा महेंद्रसिंह धोनी सध्या इंग्लंडमध्ये आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल आणि सानिया मिर्झाचे सामने बघताना तो दिसला होता. राखाडी रंगाचे ब्लेझर आणि काळा चष्मा घातलेला एमएस धोनी विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामना बघताना फोटोसाठी पोझ देताना दिसला होता. त्याचा हा फोटो विम्बल्डन आणि त्याची आयपीएल फ्रँचायझीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्यानंतर त्याने अचानक भारतीय टी २० संघाच्या ड्रेसिंग रूमलाही भेट दिली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबस्टन येथील टी २० सामना संपल्यानंतर धोनीने भारतीय खेळाडूंची भेट घेतली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ईशान किशन आणि इतरांशी संवाद साधतानाचे धोनीचे फोटो ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. ‘जेव्हा महान एमएस धोनी काही बोलतो तेव्हा प्रत्येकजण अगदी लक्षपूर्वक ऐकतो,’ अशा कॅप्शनसह हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

शनिवारी (९ जुलै) झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ४९ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. ईशान किशन इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्याच्या जागी ऋषभ पंतने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली होती.

Story img Loader