India vs England, World Cup 2023: विश्वचषक २०२३ च्या २९व्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताने १०० धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे. यासह टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. उपांत्य फेरी गाठण्यापासून संघ फक्त एक विजय दूर आहे. टीम इंडियाच्या या जबरदस्त कामगिरीवर माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमने मोठे वक्तव्य केले आहे. त्याने संघाच्या गोलंदाजांचेही कौतुक केले आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या गोलंदाजीने तो खूप प्रभावित झाला आहे.
पाकिस्तानचे माजी दोन्ही कर्णधार वसीम अक्रम आणि मिसबाह-उल-हक यांनी भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील शानदार गोलंदाजीचे कौतुक केले आहे. लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बुमराह आणि शमीने एकूण ७ विकेट्स घेतल्या. या दोघांनीही नव्या चेंडूने अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
वसीम अक्रमने पाकिस्तानच्या चॅनल ‘ए’ स्पोर्ट्सवर बोलताना जसप्रीत बुमराहबद्दल मोठे विधान केले. अक्रम म्हणाला, “बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. तो सर्व गोलंदाजांच्या खूप पुढे आहे. त्याच्याकडे अप्रतिम नियंत्रण, वेग आणि गोलंदाजीत विविधता आहे. तो एक परिपूर्ण गोलंदाज आहे. त्याला गोलंदाजी करताना पाहून मला खूप आनंद होतो. नवीन चेंडूने अशा प्रकारची स्विंग आणि सीम करण्यासाठी खूप कौशल्य असावं लागत. प्रामुख्याने तेही अशा प्रकारच्या कोरड्या खेळपट्टीवर जिथे फिरकीपटूंना खूप मदत असते. बुमराह वेग तर जबरदस्त आहेच पण त्याचा फॉलो थ्रू देखील उत्कृष्ट आहे. जिथे रात्रीच्या वेळी खूप दव पडत होते तरी देखील भारतीय गोलंदाजांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. यातून टीम इंडियाची गोलंदाजी किती परिपूर्ण आहे हे दिसून येते.”
माझ्यापेक्षा बुमराहचे नवीन चेंडूवर चांगले नियंत्रण आहे: अक्रम
नवीन चेंडूवर बुमराहचे नियंत्रण त्याच्यापेक्षा चांगले असल्याचे अक्रमने म्हटले आहे. स्विंगचा सुलतान अक्रमने, बुमराह इतका धोकादायक गोलंदाज का आहे? यावर सूचक विधान केले. अक्रमच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा बुमराह डाव्या हाताच्या फलंदाजाकडे राउंड द विकेट गोलंदाजी करतो आणि सीमवर चेंडू हिट करतो तेव्हा त्याची लेंथ ओळखणे फलंदाजाला अवघड जाते. जेव्हा तो क्रीजच्या बाहेरून बॉल टाकतो तेव्हा फलंदाजाला वाटतं की, चेंडू आतल्या बाजूने येत आहे. फलंदाज त्यानुसार शॉट खेळतो पण चेंडू खेळपट्टीवर आदळल्यानंतर तो आत येण्याऐवजी बाहेर जातो आणि बहुतेक प्रसंगी फलंदाजाला एकतर शॉट मारावा लागतो किंवा तो विकेट गमावतो.”
‘फलंदाजांना बुमराहला टाळायचे असेल तर बूट चोरा’-वसीम अक्रम
पाकिस्तानच्या माजी कर्णधार वसीम अक्रमने त्याच कार्यक्रमात फलंदाजांना बुमराहला टाळण्याचा मनोरंजक सल्ला दिला. तो म्हणाला की, “बुमराहला जर टाळायचे किंवा त्याच्यावर दबाव आणायचा असेल, त्याचे स्पाइक्स असणारे बूट चोरणे हा एकच मार्ग आहे, फलंदाजांना वाचण्यासाठी दुसरा कोणताही उपाय नाही. पाकिस्तानी गोलंदाजांनी बुमराहकडून शिकून अधिकाधिक कसोटी सामने खेळावेत,” असेही अक्रम म्हणाला.
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीबद्दल बोलताना अक्रम म्हणाला, “जेव्हा मी अशा आऊटस्विंगर्सना उजव्या हाताच्या फलंदाजांना नवीन चेंडू टाकायचो, तेव्हा कधी-कधी मला चेंडूवर ताबा ठेवता येत नसे, पण शमीचे नवीन चेंडूवर नियंत्रण नक्कीच होते. तो माझ्यापेक्षा चांगला गोलंदाज आहे. नवीन चेंडूने तो कोणत्या लेंथवर गोलंदाजी करतो, याविषयी फलंदाजांच्या मनात नेहमीच शंका निर्माण होते. मी त्यांच्या (बुमराह आणि शमी) तुलनेत कुठेच नाही. माझ्यापेक्षा ते दोघं चांगली गोलंदाजी करत आहेत.”