According to Michael Vaughan India are still strong contenders to win the series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २८ धावांनी पराभव केला. पहिली कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असली, तरी भारताला मालिका जिंकण्याची अजूनही संधी आहे. यजमान भारत अजूनही मालिका जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी कर्णधार मायकेल वॉनने व्यक्त केले.
“भारत मालिका जिंकण्यासाठी अजूनही प्रबळ दावेदार” –
माजी इंग्लिश कर्णधाराने ‘द टेलिग्राफ’साठी आपल्या स्तंभात लिहिले, “मला वाटते की भारत मालिका जिंकण्यासाठी अजूनही प्रबळ दावेदार आहे. कारण ते यावर पलटवार करतील. पण कोणती खेळपट्टी तयार होईल याचा भारत स्वतःच अंदाज लावेल. यापेक्षा खेळपट्ट्या जास्त कशा वळण घेऊ शकतात हे मला माहीत नाही. मी मालिकेपूर्वी म्हटले होते की, मला वाटते की, भारताने चेंडू वळण घेणाऱ्या खेळपट्ट्यांऐवजी अधिक सपाट खेळपट्ट्या तयार करायला हव्यात.”
सामन्याबद्दल बोलायचे तर, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार बेन स्टोक्सच्या ७० धावांमुळे संघाला २४६ धावा करण्यात यश आले. भारताकडून रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ८० धावांचे, लोकेश राहुलने ८६ धावांचे आणि रवींद्र जडेजाने ८७ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जो रूटने चार तर हार्टले आणि रेहानने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
हेही वाचा – IND vs ENG Series : पुनरागमन करण्यासाठी भारताला स्वीप आणि रिव्हर्स स्वीपसारख्या फटक्यांचा उपाय शोधण्याची गरज
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ऑली पोपने १९६ आणि बेन डकेटने ४७ धावा केल्या. भारताच्या बुमराहने चार आणि अश्विनने तीन विकेट घेतल्या. इंग्लंडचा संघ ४२० धावा करण्यात यशस्वी ठरला आणि भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. याला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या. अश्विन आणि भरत यांनी प्रत्येकी २८ धावा केल्या. इंग्लंडच्या टॉम हार्टलीने सात विकेट घेत संघाच्या विजयात सर्वात महत्त्वाचे योगदान दिले.