India vs England, Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला जानेवारी महिन्याच्या २५ तारखेपासून सुरुवात होत आहे. पहिली कसोटी हैदराबादमध्ये खेळली जाणार आहे, त्यासाठी इंग्लंड पुढील आठवड्यात युएई (संयुक्त अरब अमिराती) मार्गे भारतात पोहोचेल. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या दुखापतीबाबत एक अपडेट समोर आले आहे, तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर असू शकतो.
विश्वचषकादरम्यान मोहम्मद शमीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता मात्र, दुखापतीमुळे तो बाहेर पडला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शमीने अद्याप गोलंदाजीला सुरुवातही केलेली नाही, तो इंग्लंडविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामन्यातून बाहेर पडू शकतो. बीसीसीआयने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
मोहम्मद शमीला त्याचा फिटनेस सिद्ध करावा लागेल
बोर्डाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, “मोहम्मद शमीने अद्याप गोलंदाजी सुरू केलेली नाही. शमीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जाऊन फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. इंग्लिश संघाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याचे खेळणे संशयास्पद वाटत आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवच्या बाबतीत अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागेल. हर्नियाच्या ऑपरेशननंतर प्रशिक्षण सुरू करण्यासाठी त्याला आठ-नऊ आठवडे लागू शकतात. आशा आहे की तो आयपीएल दरम्यान तंदुरुस्त होईल.”
मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती, त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटींच्या मालिकेसाठी निवड झाली होती परंतु, बीसीसीआयने नंतर अधिकृत माहिती दिली की त्याचे खेळणे वैद्यकीय संघाच्या मान्यतेवर अवलंबून असून त्यांनी मान्यता दिली नाही. वृत्तानुसार, बीसीसीआय मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची घाई करणार नाही कारण जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराजसारखे वेगवान गोलंदाज पाच सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत उपलब्ध असतील.
हेही वाचा: IND vs SA: केप टाऊन खेळपट्टीवर हरभजन सिंगने ओढले ताशेरे; म्हणाला, “दोन दिवसात कसोटी…”
जोहान्सबर्गमध्ये सूर्यकुमार जखमी झाला होता
सूर्यकुमार आणि हार्दिक हे दोघेही आयपीएलमध्ये परतण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतील टी-२०आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमारला, जोहान्सबर्गमधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना घोट्याला दुखापत झाली होती. नुकतीच त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली असून काही महिन्यांत तो पुन्हा प्रशिक्षण शिबिरात परतण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली १३ महिन्यांनंतर टी-२० संघात परतले आहेत. रोहित शर्मा टी-२० संघाचा कर्णधार असेल. २०२२च्या टी-२० विश्वचषकानंतर रोहित किंवा कोहली या दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही. दोघांच्या पुनरागमनामुळे ते आगामी टी-२० विश्वचषकात खेळताना दिसणार असल्याचे मानले जात आहे. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या अनुभवी खेळाडूंशिवाय ऋतुराज गायकवाडची दुखापतीमुळे निवड झालेली नाही.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.