Sourav Ganguly reacts on Dhruv Jurel : भारत आणि इंग्लंडमध्ये सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील चौथा सामना रांची येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला, जिथे टीम इंडियाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. टीम इंडियाला रांची कसोटी सामना जिंकून देण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा खेळाडू म्हणजे ध्रुव जुरेल. त्याने दोन्ही डावात संघासाठी शानदार कामगिरी केली. ज्यामुळे सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर सुनील गावसकरांनी त्याची तुलना एमएस धोनीशी केली. मात्र, सौरव गांगुलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ध्रुव जुरेलने पहिल्या डावात ९० धावा केल्या, तर दुसऱ्या डावात ३९ धावांची नाबाद खेळी साकारली. जुरेलला त्याच्या दोन्ही डावात उत्कृष्ट फलंदाजी आणि यष्टिरक्षणासाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. ध्रुव जुरेलची ही कामगिरी पाहून माजी कर्णधार सुनील गावसकरही खूप खूश झाले. त्यांनी युवा यष्टिरक्षकाची तुलना एमएस धोनीशी केली. मात्र, सौरव गांगुली त्यांच्या या वक्तव्यावर खूश नसून आता जुरेलची धोनीशी केलेल्या तुलनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘एमएस धोनीला एमएस धोनी व्हायला २० वर्षे लागली’ – सौरव गांगुली
रेवस्पोर्टझशी संवाद साधताना दादा म्हणाले, “ध्रुव जुरेलने कठीण विकेटवर दडपणाखाली शानदार कसोटी सामना खेळला. त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे आणि जर त्याने ही संधी गमावली तर पुनरागमन करणे खूप कठीण होईल. एमएस धोनी हा एक वेगळ्या प्रकारचा खेळाडू. जुरेलमध्ये प्रतिभा आहे, यात शंका नाही. पण एमएस धोनीला एमएस धोनी व्हायला २० वर्षे लागली. खरं तर धोनीला धोनी व्हायला १५ वर्षे लागली. त्यामुळे जुरेलला खेळू द्या. जुरेलकडे फिरकी आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळण्याची क्षमता आहे. तसेच दबावाखाली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. हेच तुम्ही तरुण खेळाडूमध्ये शोधता.”
हेही वाचा – MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
‘तो दुसरा उदयोन्मुख एमएस धोनी’ – सुनील गावसकर
खरं तर, चौथ्या कसोटी सामन्यात समालोचन करताना सुनील गावसकर म्हणाले होते, “नक्कीच त्याने चांगली फलंदाजी केली आहे, पण त्याची किपिंग आणि यष्टीमागे त्याचे काम तितकेच उत्कृष्ट आहे. त्याच्या खेळातील जागरुकतेकडे पाहून मला असे म्हणायचे आहे की तो दुसरा उदयोन्मुख एमएस धोनी आहे.”
हेही वाचा – NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्मासह युवा ब्रिगेडने मालिका ३-१ अशी खिशात घातली आहे. या मालिकेत सर्वाधिक प्रभावित करणारा युवा खेळाडू म्हणजे २३ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल. रांची येथे खेळल्या गेलेल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या कसोटीत त्याने क्रिकेट चाहत्यांना आणि दिग्गजांना खूप प्रभावित केले आहे. या कसोटी सामन्यात तो आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. आता या मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना सात मार्चपासून सुरु होणार आहे.