IND vs ENG Tilak Varma conversation with Gautam Gambhir : तिलक वर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सलामी जोडी स्वस्तात तंबूत परतली. यानंतरही एकामागून एक फलंदाज बाद होत राहिले, पण दुसऱ्या बाजूला तिलकने संघाची धुरा सांभाळली. त्याने सामन्याच्या शेवटच्या षटकात विजय चौकार मारत भारताला २ गडी राखून रोमांचक विजय मिळवून दिला. त्याने नाबाद ७२ धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीसाठी २२ वर्षीय तिलकची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
सामनावीर ठरल्यानंतर तिलक वर्माने सांगितले की, सामन्यादरम्यान त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी चर्चा केली होती. गंभीरकडून मिळालेला गुरुमंत्र सांगताना तिलक ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, ‘विकेट थोडी टू पेस होती. मी काल गौतम सरांशी बोलत होतो, ते म्हणाले, ‘काहीही झालं तरी परिस्थितीनुसार आणि संघाला आवश्यक आहे, त्याप्रमाणे खेळले पाहिजे. त्यासाठी लवचिक असणे गरजेचे आहे.’
बिष्णोईने काम सोपे केले –
दहाव्या क्रमांकावर आलेल्या रवी बिश्नोईने दोन चौकार लगावले. त्यामुळे तिलका वर्माला सामना संपवणे सोपे झाले. तिलक म्हणाला, सर्वांनी चांगली तयारी केली होती. आम्ही नेटमध्ये खूप मेहनत केली होती आणि त्याचे फळ आम्हाला मिळाले. मी त्याला (बिश्नोई) त्याची लय कायम ठेवायला आणि गॅपमध्ये शॉट्स मारण्याचा प्रयत्न करायला सांगितलं. त्याचे वेगवान गोलंदाजाविरुद्ध फ्लिक करणे आणि लिव्हिंगस्टोनविरुद्ध चौकार मारणे उत्कृष्ट होते. त्यामुळे सामना जिंकणे सोपे झाले.
सामन्यात काय घडलं?
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने कर्णधार जोस बटलरच्या ४५ धावांच्या जोरावर ९ गडी गमावत १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने तिलक वर्माच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर २ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. तिलक ५५ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७२ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुलाई करत ४ चेंडू शिल्लक असताना विजयी चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.