भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेला एजबस्टन कसोटी सामना विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लिश चाहत्यांनी भारतीय प्रेक्षकांवर वर्णद्वेषी टिप्पणी झाली होती. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. येत्या ९ जुलै रोजी याच मैदानावर भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा टी २० सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय प्रेक्षकांसोबत गैरवर्तणूक होऊ नये यासाठी, वॉरविकशायर एजबस्टनने एक खास योजना तयार केली आहे.
शनिवारी होणारा दुसरा टी २० सामना वॉरविकशायर क्रिकेट क्लबच्या एजबस्टन मैदानावर होणार आहे. या सामन्यात वॉरविकशायरने ‘अंडरकव्हर स्पॉटर्स’ तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. वॉरविकशायर काउंटीने आज (गुरुवार) याबाबत घोषणा केली. “प्रेक्षकांमध्ये होणाऱ्या गैरवर्तनाचा मागोवा घेण्याच्या आणि त्वरित कारवाईच्या उद्देशाने संपूर्ण स्टेडियममध्ये स्पॉटर्स तैनात केले जातील,” असे क्लबने एका निवेदनात म्हटले आहे.
क्लबने म्हटले आहे की, ‘क्लब कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेषी वर्तनाचा जाहीर निषेध करतो. अशा प्रकारच्या गुन्ह्यात एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास तिच्यावर एजबस्टन येथे येण्यास बंदी घातली जाईल. शिवाय, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डच्या (ईसीबी) अधिकार क्षेत्रातील सर्व क्रिकेटच्या मैदानावर ही बंदी लागू असेल.’