India vs England, World Cup 2023: लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक २०२३च्या २९व्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, दुसरीकडे, इंग्लंडला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक केले. या विजयाचे श्रेय त्याने आपल्या अनुभवी खेळाडूंना दिले. मात्र, फलंदाजीतील कामगिरीवर त्याने निराशा व्यक्त केली.
अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर रोहित शर्मा खूश
इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन कार्यक्रमात या सामन्यातील आव्हानांचा उल्लेख केला. तो म्हणाला, “हा एक उत्तम सामना होता, त्यात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. जेव्हा कठीण प्रसंग आला तेव्हा सर्व अनुभवी खेळाडू योग्य वेळी सांघिक कामगिरी करण्यासाठी एकत्र माझ्या पाठिशी उभे राहिले. गेल्या पाच सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग केल्यानंतर आम्हाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आम्हाला अशी धावसंख्या उभी करायची होती ज्याचे आम्ही संरक्षण करू शकतो.”
टीम इंडियाच्या फलंदाजीबाबत रोहित शर्मा पुढे म्हणाला, “आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मात्र आम्ही कमी पडलो. संघाने फलंदाजीत चांगली कामगिरी करणे आवश्यक होते. ही खेळपट्टी इतर खेळपट्टीपेक्षा वेगळी होती. त्यामुळे इथे संयम ठेवून खेळी करणे आवश्यक होते. सुरुवातीला वेळ घालवणे हे जास्त आवश्यक होते आणि करताना कोणीही दिसत नव्हते. सुरुवातीला तीन विकेट्स गमावणे ही मोठ्या सामन्यांमध्ये न परवडणारी गोष्ट आहे. अशी परिस्थिती एकदा आली ते ठीक आहे पण सारखी सारखी येणे ही चांगली बाब नाही. या परिस्थितीत तुम्हाला फक्त चांगल्या भागीदारीची गरज आहे, जी आम्हाला फक्त दोनवेळा करता आली. आम्ही याहून चांगले खेळू शकतो, असा सकारात्मक विचार सध्या मी करत आहे.”
हिटमॅन पुढे म्हणाला, “जेव्हा तुमचा डाव सुरू होतो, तेव्हा विरोधी संघावर दबाव वाढवण्यासाठी तुम्हाला विकेट्स घेण्याची गरज असते. आमच्या गोलंदाजांकडे असलेल्या अनुभव आणि क्षमतेमुळे नेहमीच यश मिळेल असा विश्वास ठेवू शकतो. आमच्या गोलंदाजांनी खरा विजय मिळवून दिला, त्यांनी परिस्थितीचा उत्तम फायदा घेतला. थोडा स्विंग आणि लॅटरल सीम चेंडू होत होता, पण त्यांनी योग्य ठिकाणी चेंडू टाकून फलंदाजांच्या मनात शंका निर्माण केली. या परिस्थितीत आमच्याकडे चांगले अनुभवी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू होते, त्यामुळेच भारताला विजय मिळाला.”
बटलरने इंग्लंडच्या फलंदाजीला निराशाजनक म्हटले
या स्पर्धेतील पाचव्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने संघाची कामगिरी निराशाजनक असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “आम्ही समोरच्या संघावर दबाव निर्माण केला होता. संघाने चांगली गोलंदाजी केली आणि विकेटही घेतल्या. यावेळी आपण ज्या पद्धतीने काम करत आहोत, ते कुठेतरी कमी पडत आहे असे वाटते. पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात झाली होती. खेळपट्टीवर काही ठिकाणी बाऊन्स हा कमी जास्त प्रमाणात दिसत होता. तसेच, संघाचे क्षेत्ररक्षणही चांगले होते.”
संघाच्या निराशाजनक फलंदाजीबाबत बटलर पुढे म्हणाला, “आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते अजिबातच अपेक्षित नव्हते.” चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होण्याच्या प्रश्नावर तो म्हणाला की, “आम्हाला याची कल्पना आहे. अजून सामने खेळायचे आहेत. या स्पर्धेच्या गुणतालिकेत इंग्लंड हा विश्वचषक २०१९चा विजेता संघ शेवटच्या स्थानावर आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये इंग्लंडला केवळ एकच सामना जिंकता आला असून, उर्वरित पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.