Yashasvi Jaiswal broke Virat Kohli’s record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. भारतीय संघाने पहिल्या डावात इंग्लंडला २१८ धावांत गुंडाळले. त्याचवेळी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करताना युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने इतिहास रचला आहे. त्याने असा पराक्रम केला आहे जो याआधी कोणताही भारतीय फलंदाज करू शकला नाही. त्याने याबाबती विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.
यशस्वी जैस्वालने रचला इतिहास –
हा सामना सुरू होण्यापूर्वी यशस्वी जैस्वालने या मालिकेत ४ सामन्यात ६५५ धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत त्याने धरमशाला कसोटीत खाते उघडताच या मालिकेत ६५६ धावा पूर्ण केल्या. यासह तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ६५५ धावा केल्या होत्या.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय :
यशस्वी जैस्वाल – ६५६+ धावा, २०२४
विराट कोहली – ६५५ धावा, २०१६
राहुल द्रविड – ६०२ धावा, २००२
विराट कोहली – ५९३ धावा, २०१८
विजय मांजरेकर – ५८६ धावा, १९६१
हेही वाचा – ISPL : सचिनकडून पॅरा क्रिकेटपटूचा गौरव! हात नसलेल्या आमिरने अक्षय कुमार-मुनावर फारुकीला केली गोलंदाजी
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
ग्रॅहम गूच – ३ सामने, ७५२ धावा
जो रूट – ५ सामने, ७३७ धावा
यशस्वी जैस्वाल – ४ सामने, ६५६+ धावा*
विराट कोहली – ५ सामने, ६५५ धावा
मायकेल वॉन – ४ सामने, ६१५ धावा
भारताच्या फिरकी समोर इंग्लंडचे फलंदाज हतबल –
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर इंग्लंड संघाची सुरुवातही चांगली झाली, पण त्याचा फायदा मधल्या फळीतील फलंदाजांना उठवता आला नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ५७.४ षटकांत २१८ धावांवर गारद झाला. इंग्लंडसाठी झॅक क्रॉऊलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. टीम इंडियासाठी कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कुलदीप यादवने १५ षटकांत ७२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी रविचंद्रन अश्विनने ४ विकेट्स घेण्यात यश मिळवले. याशिवाय रवींद्र जडेजाला १ विकेट मिळाली. प्रत्युत्तरात भारताने एकही विकेट न गमावता ६६ धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा ३८ धावा करून क्रीजवर आहे, तर यशस्वी जैस्वालने २८ धावा केल्या आहेत.