IND vs ESP Hockey: ओडिशामधील राऊरकेला येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली आहे. सलामीच्या पहिल्या सामन्यात त्याने स्पेनचा २-० असा पराभव केला. भारताकडून या सामन्यात अमित रोहिदास आणि हार्दिक सिंगने गोल केले. भारताचा दुसरा सामना आता १५ जानेवारीला (रविवार) बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या सामन्यात वेल्सचा ५-० असा पराभव केला. अमित रोहिदासला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
भारताने ३७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. कर्णधार आणि पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट हरमनप्रीत सिंग मैदानावर नव्हता. अशा स्थितीत इतर खेळाडूंसमोर चेंडू गोलपोस्टमध्ये टाकण्याचे आव्हान होते. भारतीय संघाला सामन्यातील चौथ्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. भारताने ४३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरही वाया घालवला. अशाप्रकारे टीम इंडियाला आतापर्यंत पाचपैकी चार पेनल्टी कॉर्नर मिळालेले त्यात फक्त एकच गोलमध्ये ते रुपांतर करू शकले.
तत्पूर्वी, पहिल्या क्वार्टरमध्ये ११व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. यावर टीम इंडिया गोल करू शकली नाही. यानंतर पुढच्याच मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर अमित रोहिदासने शानदार गोल केला. त्यावेळी सामन्यात टीम इंडिया १-० ने पुढे होता. या विश्वचषकात भारताचा हा पहिलाच गोल होता. १३व्या मिनिटाला टीम इंडियाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचे रूपांतर संघ गोलमध्ये करू शकला नाही.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. स्पेनच्या संघाला २४व्या मिनिटाला गोल करता आला नाही. भारताचा गोलरक्षक क्रिशन पाठकने अप्रतिम बचाव केला. त्याने स्टिकने चेंडूची दिशा बदलली. भारताने २६व्या मिनिटाला दुसरा गोल केला. हार्दिक सिंगने चार खेळाडूंना चकमा देत जबरदस्त गोल केला. त्याचा हा गोल चाहते कधीच विसरू शकणार नाही. या विश्वचषकात भारताचा हा पहिला मैदानी गोल होता. हार्दिक स्पेनच्या वर्तुळात चेंडू घेऊन पुढे जात होता तेव्हा त्याला गोलपोस्टजवळ उभ्या असलेल्या ललित उपाध्यायला चेंडू द्यायचा होता, पण स्पेनच्या बचावपटूला आदळल्याने चेंडू गोलपोस्टमध्ये गेला. त्याचा फायदा भारताला झाला आणि हार्दिकने टीम इंडियाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
हाफ टाईमपर्यंत टीम इंडिया २-० ने पुढे होता. भारताने पहिल्या ३० मिनिटांत शानदार कामगिरी केली होती. टीम इंडिया प्रत्येक बाबतीत स्पेनच्या पुढे होती. गोल करण्यासाठी भारताने चार शॉट्स घेतले, ज्यात दोन यशस्वी झाले. तर स्पेनने तीन शॉट्स घेतले पण एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही. ७५ टक्के चेंडूचा ताबा फक्त भारताकडे राहिला. टीम इंडियाला आतापर्यंत तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले असून एक गोल केला आहे. स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्याचे रुपांतर करता आले नाही.
सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. स्पेनच्या खेळाडूंच्या चुकीमुळे ३२व्या मिनिटाला टीम इंडियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावर प्रत्येकाला गोलची अपेक्षा होती. कर्णधार हरमनप्रीत सिंग स्ट्रोक घेण्यासाठी मैदानाबाहेर आला, पण त्याला स्पॅनिश गोलकीपरच्या पुढे जाण्याचा मार्ग सापडला नाही. चेंडू गोलरेषा ओलांडू शकला नाही आणि टीम इंडियाला तिसरा गोल करता आला नाही.