भारत विरुद्ध आयर्लंड या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने मालिका २-० अशी जिंकत इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. भारताने दिलेले २१४ धावांचे आव्हान आयर्लंडला पेलवले नाही. त्यांचा डाव १२.३ षटकांत ७० धावांत आटोपला. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्या फिरकीने सामन्यात कमाल केली. दोघांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले. आयर्लंडकडून कर्णधार गॅरी विल्सनने १५, विल्यम पोर्टरफिल्ड याने १४, थॉम्पसनने १३ आणि रँकीनने १० धावा केल्या. या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

या सामन्यात विविध विक्रमाची नोंद झाली. पण त्याहीपेक्षा लक्षवेधी ठरला धोनीचे ‘ते’ कृत्य. या सामन्यासाठी भारताकडून महेंद्र सिंग धोनी याच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली. पण, तरीही धोनीने मैदानात येऊन असे काही केले की त्याने क्रिकेट रसिकांची मने जिंकली. या सामन्यात धोनी हा चक्क ”वॉटरबॉय’च्या भूमिकेत दिसला आणि साऱ्यांची मने त्याने जिंकली.

सामन्यात भारताला पहिले फलंदाजीची संधी मिळाली. भारताकडून सुरेश रैना आणि मनीष पांडे हे दोन खेळाडू फलंदाजी करत होते. त्या वेळी दोन षटकांमध्ये ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आला. धोनी हा नेहमीच साधेपणा आणि शांत व संयमी स्वभावाची ओळखला जातो. त्याच्या याच सवयीनुसार अनेक नवोदित खेळाडू संघाबाहेर बेंचवर बसले असूनही खुद्द महेंद्र सिंग धोनी पाणी आणि किट बॅग घेऊन मैदानात आला. धोनीला ‘वॉटरबॉय’ झालेले पाहून स्टेडियमधील प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवत त्याच्या या स्वभावाची प्रशंसा केली.

Story img Loader