IND vs IRE : भारतीय टी २० संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि यजमान संघात दोन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना आज (२६ जून) डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर झाला. भारताने हा सामना सात गडी राखून जिंकला. या विजयामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय टी २० संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. कर्णधार पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळे सामना दोन तास उशीरा सुरू करण्यात आला. दोन्ही डावांतील ८-८ षटके कमी करण्यात आली.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या यजमानांची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. आयर्लंडचे पहिले तीन गडी झटपट बाद झाले. मात्र, आयर्लंडच्या हॅरी टेक्टरने शानदार फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३३ चेंडूत ६४ धावा करून संघाला १०८ धावांपर्यंत नेऊन पोहचवले. भुवनेश्वर, पंड्या, आवेश खान आणि चहलला प्रत्येक एक बळी मिळाला.

यजमानांनी दिलेले १०९ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने ९.२ षटकांमध्येच विजय मिळवला. कारकीर्दीमध्ये दुसऱ्यांदाच सलामीला आलेल्या दीपक हुड्डाने चमकदार कामगिरी केली. त्याने २९ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी केली. त्याला ईशान किशन (२६) आणि हार्दिक पंड्याने (२४) साथ दिली.

Story img Loader