भारतीय संघाचा नवीन धडाकेबाज फलंदाज दीपक हुडाने आयर्लंड विरुद्धच्या टी २० सामन्यात शतकी खेळी केली. अवघ्या सहा आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांचा अनुभव असलेल्या हुडाने ५७ चेंडूत १०४ धावा केल्या. त्याने आपल्या या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकार फटकावले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरला.
हुडाने १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले. त्यासाठी तो ५५ चेंडू खेळला. शतक पूर्ण करताच तो सुरेश रैना, रोहित शर्मा आणि केएल राहुलनंतर आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात शतक करणारा चौथा फलंदाज ठरला.
दीपक हुडाने संजू सॅमसनसोबत विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी मिळून १७६ धावा जोडल्या. ही आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये कोणत्याही गड्यासाठी भारताची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. या दरम्यान संजू सॅमसनने देखील आंतराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले.