IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal’s partnership record : भारत आणि आयर्लंड महिला संघात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाने नुकतीच पदार्पण केलेल्या प्रतिका रावलसह डावाची सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करताना शतकं झळकावली. त्याचबरोबर स्मृती आणि प्रतिकाने पहिल्या विकेट्साठी विक्रमी भागीदारी इतिहास घडवला. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी २३३ धावांची भागीदारी रचत २० वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला.
दोन्ही फलंदाजांनी एकदिवसीय डावाची सुरुवात टी-२० शैलीत केली आणि आक्रमक फलंदाजी करत पहिल्या १० षटकात ९० धावा केल्या. १३ षटके पूर्ण झाल्यावर दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी झाली. अशाप्रकारे मानधना आणि रावल या सलामीच्या जोडीने सलग दुसऱ्या वनडे सामन्यात शतकी भागीदारी करण्याचा मोठा पराक्रम केला. एवढेच नाही तर या सलामीच्या जोडीमध्ये चौथ्यांदा शतकी भागीदारी पाहायला मिळाली.
भारतासाठी सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्या –
५ – अंजू जैन आणि जया शर्मा (२७ डाव)
५ – करुणा जैन आणि जया शर्मा (२५ डाव)
४ – स्मृती मानधना आणि प्रतिका रावल (६ डाव)
३ – स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्स (१३ डाव)
या भारतीय सलामी जोडीने २० षटकात १५७ धावा केल्या होत्या. या काळात दोघीनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. अशाप्रकारे, ही जोडी सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० हून अधिक धावांची भागीदारी करणारी जगातील चौथी आणि भारताची पहिली जोडी ठरली.
स्मृती मानधनाने आयरिश गोलंदाजांची धुलाई करताना ७० चेंडूत शतक झळकावले आणि अशा प्रकारे भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारी महिला खेळाडू ठरली. शतक झळकावल्यानंतरही मंधानाने रावलसह धावांचा वेग कायम राखला आणि लवकरच भारताची धावसंख्या २०० पार केली.
स्मृती-प्रतिकाने मोडला २० वर्षं जुना विक्रम –
यानंतर भारतीय संघाला स्मृती मानधनाच्या (१३५) रुपाने पहिला धक्का बसला. आपल्या या खेळीत तिने ८० चेंडूचा सामना करताना १२ चौकार आणि ७ षटकारांचा पाऊस पाडला. यासोबतच मानधना आणि प्रतिका यांच्यातील भागीदारीही तुटली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी २३३ धावांची भागीदारी केली जी भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही विकेट्ससाठी तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे. यासह स्मृती-प्रतिका जोडीने २० वर्षे जुना विक्रम मोडला. यादरम्यान प्रतिका रावलने आपले पहिले वनडे शतक झळकावले. तिने १२९ चेंडूचा सामना करताना २० चौकार आणि एक षटकार मारला.
महिला एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वोच्च भागीदारी (कोणत्याही विकेट्ससाठी) –
३२० – पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा विरुद्ध आयर्लंड, पॉचेफस्ट्रूम, २०१७
२५८* – मिताली राज आणि रेश्मा गांधी विरुद्ध आयर्लंड, मिल्टन केन्स, १९९९
२३३ – स्मृती मानधना आणि प्रतिका रावल विरुद्ध आयर्लंड, राजकोट, २०२५
२२३* – अंजुम चोप्रा आणि जया शर्मा विरुद्ध पाकिस्तान, कराची, २००५
१९० – स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध न्यूझीलंड, नेपियर, २०१९