India vs Ireland 3rd T20: भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका संपन्न झाली. काल दोन्ही संघामध्ये तिसरा टी२० सामना होता, या सामन्याचा निकाल अखेर लागला आहे. पण आयर्लंड आणि भारत यांच्यातील यापूर्वी सात सामन्यांमध्ये जे कधीही घडलं नव्हतं ते आता आठव्या लढतीत घडलेलं आहे. भारत-आयर्लंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पावसाने खोडा घातल्याचे पाहायला मिळाले. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर लाखोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, परंतु पावसाने सर्वांचाचं हिरमोड केला. तब्बल तीन तासानंतर तुफान कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली अन् खेळाडू मैदानावर सरावासाठी आले. त्यानंतर अंपायर्सनी खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी केली, अखेर साडेतीन तासानंतर टीम इंडियाला मालिकेत २-०ने विजयी घोषित करण्यात आले आणि शेवटचा सामना रद्द झाला.
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील टी२० मालिकेतील तिसरा टी२० सामन्यात पावसाने तुफान बॅटिंग केल्याने सामना नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. यासह जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंडविरुद्धची मालिका २-०ने जिंकली आहे. मालिकेतील पहिला सामनाही पावसाने व्यत्यय आणला आणि भारताने डीएलएस पद्धतीने सामना जिंकला.
भारताने मालिका २-० ने जिंकली
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. डकवर्थ लुईस (DLS) पद्धतीनुसार भारताने पहिला टी२० सामना २ धावांनी जिंकला. यानंतर संघाने दुसरा टी२० सामना ३३ धावांनी जिंकला. याशिवाय तिसरी टी२० पावसामुळे रद्द झाली आणि भारताने मालिका २-०ने जिंकली.
तिसऱ्या टी२० सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय येत होता. त्यामुळे नाणेफेक उशिरा होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण पावसाचा जोर काही कमी होत पाऊस थांबल्यावर मैदान लवकरात लवकर सुकवण्याची व्यवस्था केली जाणार होती. त्यामुळे पाऊस थांबल्यावर लगेच हा सामना सुरु होऊ शकते, असे म्हटले जात होते. पण पावसाची संततधार सुरूच होती, त्यामुळे हा सामना अखेर पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या आजच्या तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बेंच स्ट्रेंथमधील खेळाडूंना संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पावसामुळे ही संधी काही टीम इंडियाला मिळाली नाही.
या टॉप-3 फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील टी२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऋतुराज गायकवाड पहिल्या स्थानावर आहे. त्याने २ सामन्यात ७७ धावा केल्या आहेत. यानंतर अँड्र्यू बालबर्नी ७६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय कर्टिस कॅम्फर ५७ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
या टॉप-३ गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील T20I मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत जसप्रीत बुमराह २ सामन्यात ४ विकेट्स घेऊन पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय रवी बिश्नोई २ सामन्यात ४ विकेट्स घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. तर प्रसिद्ध कृष्णा २ सामन्यात ४ विकेट्स घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे.
आशिया कप आणि विश्वचषकापूर्वी भारतासाठी शुभ संकेत
दुसरीकडे, आयर्लंडविरुद्धची ही तीन सामन्यांची टी२० मालिका वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णाच्या पुनरागमनाची मालिका होती. त्याच वेळी, या मालिकेदरम्यान, दोन्ही गोलंदाज चांगल्या लयीत दिसले, जे आशिया चषक आणि विश्वचषक २०२३ सुरू होण्यापूर्वी भारतासाठी एक शुभ संकेत आहेत.
हेही वाचा: Asia Cup 2023: टीम इंडियाला ‘ती’ चूक पडणार महागात? गौतम गंभीरच्या विधानामुळे उडाली खळबळ
या टी२० मालिकेदरम्यान दोन्ही गोलंदाज ज्या प्रकारे लयीत दिसले, त्यानंतर असे म्हणता येईल की हे दोघेही आशिया कप आणि त्यानंतर विश्वचषकात भारताच्या वेगवान गोलंदाजीसाठी तयार आहेत. दुसरीकडे, टीम इंडियाबद्दल माहिती दिली तर आता २ सप्टेंबरला आशिया कप २०२३च्या तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी थेट लढत होताना दिसेल. दोन्ही संघांमधील हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.