India vs Nederland, ICC World Cup 2023: विश्वचषक २०२३ च्या ४५व्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने गट फेरीतील आपले सर्व सामने जिंकले. भारताने विश्वचषकातील सर्व संघांचा पराभव केला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने ५० षटकांत चार विकेट्स गमावत ४१० धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ४७.४ षटकांत सर्वबाद २५० धावांवर आटोपला. टीम इंडियाने दिवाळीच्या दिवशी चाहत्यांना विजयाची भेट दिली. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे कौतुक करताना म्हणाले की, “आमच्या भारतीय क्रिकेट टीमने दिवाळी आणखी खास बनवली आहे. नेदरलँड्सविरुद्ध शानदार विजय संपादन केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! सर्व खेळाडूंचे कौशल्य आणि सांघिक कामगिरीमुळे टीम इंडिया अशी प्रभावी कामगिरी करू शकला. उपांत्य फेरीत पोहचल्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!” भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा भारतीय संघाचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “शानदार कामगिरी! आमच्या भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत विजयी घौडदौड सुरूच ठेवली आहे. त्यांचे अभिनंदन आणि उपांत्य फेरीसाठी शुभेच्छा.”
भारताचा मोठा विजय
गट फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा सामना आता पहिल्या सेमीफायनलमध्ये १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. त्यांनी सर्व नऊ विरोधकांचा पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडचा पराभव केला. पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाचे १८ गुण आहेत. गट फेरीत त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, नेदरलँड्सने विश्वचषक २०२३चा प्रवास १०व्या स्थानावर संपवला. त्यांना नऊ सामन्यांत दोन विजय मिळवता आले. नेदरलँड्सला सात सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर नेदरलँड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
भारताच्या नऊ खेळाडूंनी गोलंदाजी केली
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. रोहित शर्माने ११ पैकी नऊ खेळाडूंना गोलंदाजी दिली. केवळ के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी गोलंदाजी केली नाही. संघाचे वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनाही गोलंदाजीची संधी मिळाली. भारताकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद शमीला या सामन्यात एकही यश मिळाले नाही.
नेदरलँडकडून तेजा निदामनुरूने अर्धशतक झळकावले
नेदरलँड्सकडून या सामन्यात केवळ एका खेळाडूने अर्धशतक झळकावले. तेजा निदामनुरूने सर्वाधिक ५४ धावा केल्या. सायब्रँडने ४५, कॉलिन अकरमन ३५ आणि मॅक्स ओडाडने ३० धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने १७ धावा केल्या. लोगान व्हॅन बीक आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे प्रत्येकी १६ धावा करून बाद झाले. बास डी लीडेने १२ धावा, आर्यन दत्तने पाच धावा आणि वेस्ली बॅरेसीने चार धावा केल्या. पॉल व्हॅन मीकरेन तीन धावा केल्यानंतर नाबाद राहिला.