India vs Nederland, ICC World Cup 2023: भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत केवळ धावाच करत नाही, तर आता त्याने गोलंदाजीतही चमत्कार केला आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या विश्वचषकातील ४५व्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात त्याने विकेट घेतली. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्णधार रोहित शर्माने विराटला गोलंदाजीसाठी बोलावले. कोहलीने नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डसला बाद केले. त्याची विकेट घेताच त्याची पत्नी अनुष्का शर्मा स्टँडमध्ये नाचू लागली.
रोहितने २३वे षटक टाकण्यासाठी कोहलीला बोलावले. विराटने पहिल्या षटकात सात धावा दिल्या. यानंतर, त्याने नेदरलँड्सच्या डावातील २५व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. कोहलीने एडवर्ड्सला के.एल. राहुलकरवी झेलबाद केले. विराटची विकेट घेताच अनुष्काने आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोहलीने तब्बल नऊ वर्षांनी घेतली विकेट
विराट कोहलीने २०१४ नंतर प्रथमच एकदिवसीय सामन्यात विकेट घेतली आहे. गेल्या वेळी त्याने वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ब्रेंडन मॅक्युलमला बाद केले होते. त्याचे हे वनडेमधील पाचवे यश आहे. विश्वचषकात त्याने प्रथमच विकेट घेतली आहे. विराट कोहलीने २०१४ मध्ये नेदरलँडविरुद्ध विकेट घेण्यापूर्वी एक विकेट घेतली होती. आज विराटने नेदरलँड्सविरुद्ध शानदार फलंदाजी करत ५६ चेंडूत ५१ धावा केल्या. ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. या खेळीसह कोहली विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या २८५ एकदिवसीय सामन्यांपैकी फार कमी गोलंदाजी केली आहे. या काळात त्याने ४९ डावात चार विकेट्स घेतल्या आहेत. कोहलीने ३१ ऑगस्ट २०१७ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वनडेत शेवटची गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात त्याने दोन षटके टाकली आणि १२ धावा दिल्या. एकदिवसीय विश्वचषकात, २०१५ च्या उपांत्य फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक षटक टाकले आणि सात धावा दिल्या. एकंदरीत, कोहलीने सर्व फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६१.५ षटकात आठ विकेट्स घेतल्या आहेत.
कोहलीने ५१ धावांची खेळी खेळली
यापूर्वी विराटने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली होती. त्याने ५६ चेंडूत ५१ धावा केल्या. कोहलीने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद १२८ आणि के.एल. राहुलने १०२ धावा केल्या. रोहित शर्माने ६१ धावांची तर शुबमन गिलने ५१ धावांची खेळी केली. टीम इंडियाने नेदरलँड्सविरुद्ध ५० षटकांत चार विकेट्स गमावत ४१० धावा केल्या.