India vs Netherlands, World Cup 2023: क्रिकेट विश्वचषक २०२३च्या मोठ्या उपांत्य फेरीपूर्वी, उत्साही टीम इंडिया आपल्या शेवटच्या लीग सामन्याची तयारी करत आहे. आठ सामन्यांतून आठ विजयांसह, ‘मेन इन ब्लू’ सर्व लीग सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. हा सामना १२ नोव्हेंबरला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. सराव सत्रात शुबमन गिल आणि इतर खेळाडू नेटमध्ये जोरदार सराव करताना दिसले, मात्र स्टार फलंदाज विराट कोहली या सत्रात सहभागी झाला नाही.
भारतीय संघाने सराव केला
भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना उच्च स्कोअरिंग असण्याची अपेक्षा आहे आणि बुधवारी वैकल्पिक प्रशिक्षण सत्रादरम्यान शुबमन गिल आणि के.एल. राहुलसह खेळाडू नेटमध्ये मोठे शॉट मारताना दिसले. भारताने आतापर्यंत आठ सामने खेळले असून, या सर्व सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आहे.
गिलने सरावात मोठे फटके मारले
नुकत्याच नवीन आयसीसी क्रमवारी जाहीर झाली असून त्यात शुबमन गिलने बाबर आझमला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचाच परिणाम सराव सत्रात दिसून आला. त्याने नेट बॉलर्सवर हल्लाबोल करत दमदार षटकार मारले. २४ वर्षीय खेळाडू अजूनही विश्वचषकातील आपल्या पहिल्या शतकाच्या शोधात आहे. भारतीय सलामीवीराने या स्पर्धेत आतापर्यंत सहा डावांत २१९ धावा केल्या आहेत, ज्यात श्रीलंकेविरुद्धच्या 92 धावांचा समावेश आहे.
शुबमन गिल, के.एल. राहुल आणि इतरांनी नेटमध्ये कठोर परिश्रम केले. दुसरीकडे, स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीने सराव सत्राला दांडी मारली. त्याने हे पर्यायी सत्र वगळण्याचा निर्णय घेतला आणि हॉटेलमध्येच विश्रांती घेतली. त्यामुळे त्याला काही दुखापत झाली किंवा आजारी आहे, असे प्रश्न विराटचे चाहते विचारत आहेत. आजच्या सराव सत्रासाठी एकूण ९ खेळाडू स्टेडियममध्ये उपस्थित होते.
रोहित शर्मा, प्रसिध कृष्णा, शुबमन गिल, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर हे सराव सत्रामध्ये सहभागी झालेले खेळाडू होते. कर्णधार रोहित शर्मा जरी सराव सत्राला उपस्थित असला तरी त्याने सराव केला नाही आणि इतर फलंदाजांशी संवाद साधण्यात वेळ घालवला.
भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी आला आहे
टीम इंडियाची नजर तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याकडे आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये भारत चॅम्पियन झाला होता. आता संघाला तिसऱ्यांदा विजय मिळवून देण्याची जबाबदारी रोहित शर्मावर आहे. भारतीय संघाची ताकद पाहून चाहत्यांना आशा आहे की यावेळी ट्रॉफी आपल्या देशातच राहील. यजमान संघ मायदेशातील परिस्थितीचा फायदा घेऊन चॅम्पियन होणार, असा सर्व भारतीयांना विश्वास वाटत आहे.