India vs Nederland’s, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये, भारतीय संघ साखळी टप्प्यातील शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आपल्या काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. या स्थितीत फलंदाजांमध्ये इशान किशन आणि गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विनला खेळण्याची संधी मिळू शकते. कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक द्रविड यांनी जबरदस्त फॉर्मात असलेल्या बुमराह आणि शमीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्यास प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनाही खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र, एवढे बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
रोहित शर्मा आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला त्यांच्या संघात फारसे बदल करणे पसंत नाही. जरी पराभव झाला तरी रोहित आपल्या खेळाडूंवर विश्वास व्यक्त करतो आणि त्याच खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी पुन्हा संधी देतो. या विश्वचषकात भारतीय संघाने सलग आठ सामने जिंकले आहेत, त्यामुळे संघात कोणताही बदल करण्याचा प्रश्नच येत नाही.
या विश्वचषकात टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरु आहे. रोहित सलामीला आक्रमक फलंदाजी करत आहे आणि शुबमन गिलही त्याला उपयुक्त खेळी खेळत चांगली साथ देत आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर अप्रतिम कामगिरी करत आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम विश्वचषक ठरला आहे. श्रेयस अय्यरही चौथ्या क्रमांकावर फॉर्ममध्ये परतला आहे आणि दुखापतीतून परतल्यानंतर राहुल पाचव्या क्रमांकावर जबरदस्त खेळी करत आहे.
सहाव्या क्रमांकावर संधी मिळाल्यापासून सूर्यकुमार यादवने आपले काम चोख बजावले आहे आणि जडेजाही सातव्या क्रमांकावर फिनिशरची भूमिका निभावताना दिसत आहे. जडेजा आणि कुलदीप ही जोडी गोलंदाजीतही कमालीची कामगिरी करत आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे त्रिकूट वेगवान गोलंदाजीत ऐतिहासिक कामगिरी करत आहे. अशा स्थितीत भारतीय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.
नेदरलँड्सबद्दल जर बोलायचे झाले तर या संघातही बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र, मॅक्स ओडवाडच्या जागी विक्रमजीत सिंगला संधी दिली जाऊ शकते. दोन्ही खेळाडू खराब फॉर्ममुळे मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले आहेत. अशा स्थितीत संघात फारसे बदल होण्याची शक्यता नाही.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग-११
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
नेदरलँड्स: वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडवाड, कॉलिन एकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (सी आणि डब्ल्यूके), बास डी लीडे, तेजा एनदामानुरु, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.