भारत आणि न्यूझीलंड संघात सध्या तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने १२ धाावांनी जिंकला. त्यामुळे भारतीय संघाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यानंतर भारतीय संघासाठी एक वाईट बातमीसमोर आली आहे. भारताला स्लो ओव्हर रेटसाठी मॅच फीच्या ६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना १८ जानेवारी रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी भारताला दंड ठोठावण्यात आला. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनलचे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी सांगितले की, भारताने वेळेनुसार तीन षटके हळू टाकली. निर्णयावर येण्यापूर्वी वेळ भत्ता विचारात घेतला गेला होता.
खेळाडू आणि खेळाडू सहाय्य कर्मचार्यांसाठी आयीसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२२नुसार, जे निर्धारित वेळेत गोलंदाजी करू शकत नाहीत. त्यांना विलंब लावल्यामुळे प्रत्येक षटकानुसार खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या २० टक्के दंड आकारला जातो.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने मैदानावरील पंच अनिल चौधरी आणि नितीन मेनन, तिसरे पंच केएन अनंतपद्मनाभन आणि चौथे पंच जयरामन मदनगोपाल यांनी लावलेला गुन्हा स्वीकारला. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नव्हती.
हेही वाचा – IND vs SA Womens: अमनजोत कौरचा मोठा धमाका; पदार्पणाच्या सामन्यातच मोडला ९ वर्षापूर्वीचा ‘हा’ विक्रम
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेबद्दल बोलायचे, टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १२ धावांनी जिंकला. भारताच्या या विजयात महत्त्वाचे योगदान शुभमन गिलचे होते, ज्याने द्विशतक झळकावून भारताला ३४९ धावांपर्यंत नेले. गिलने २०८ धावांची धडाकेबाज खेळी खेळली आणि दुहेरी शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ३३७ धावांवर गडगडला.