श्रेयस अय्यरची शतकी खेळी आणि त्याला विराट-लोकेश राहुलने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात ३४७ धावांपर्यंत मजल मारली आहे. अय्यरने १०३ धावांची खेळी करत भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली. याव्यतिरीक्त मधल्या फळीत यष्टीरक्षणाची भूमिका सांभाळणाऱ्या लोकेश राहुलनेही न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ६४ चेंडूत राहुलने ३ चौकार आणि ६ षटकारांसह ८८ धावा केल्या. या खेळीदरम्यान राहुलने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला.
न्यूझीलंडमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षकाचा मान आता राहुलला मिळाला आहे. त्याने धोनीचा ८५ धावांचा विक्रम मोडीत काढला.
Highest Odi score by Indian WK in NZ
Rahul – 88* (Today)
Dhoni – 85*
Dhoni – 84*
Dhoni – 79*
Dhoni – 68
Dhoni – 56
Dhoni – 50#INDvsNZ— CricBeat (@Cric_beat) February 5, 2020
दरम्यान, रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारताकडून मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी सलामीला मैदानात उतरली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्येही अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र भारतीय सलामीवीरांना झटपट माघारी धाडण्यात न्यूझीलंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. विराट कोहली इश सोधीच्या गोलंदाजीवर ५१ धावा काढून माघारी परतला.
यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल जोडीने पुन्हा एकदा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी १३६ धावांची भागीदारी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. श्रेयस अय्यरने यादरम्यान आपलं शतकही पूर्ण केलं. मात्र टीम साऊदीच्या गोलंदाजीवर अय्यर १०३ धावा काढून माघारी परतला. दरम्यान लोकेश राहुलनेही यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताला त्रिशतकी धावसंख्या ओलांडून देण्यासाठी मदत केली.