बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना हैदराबाद खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १२ धावांनी विजय मिळवला. हा सामना जरी भारतीय संघाने जिंकला असला, तरी मायकेल ब्रेसवेलने आपल्या शतकी खेळीने सर्वांच्या लक्ष वेधून घेतले. त्याने ७८ चेंडूत १४० धावांची शानदार खेळी केली. त्याचबरोबर त्याने धोनीच्या एका विक्रमाची बरोबरी केली.
ब्रेसवेलने या दरम्यान ५७ चेंडूत शतकही झळकावले, जे न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजाचे तिसरे जलद शतक आहे. या शतकासह न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. ब्रेसवेलपूर्वी, धोनी हा जगातील एकमेव खेळाडू होता, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये ७ व्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत दोन शतके केली होती.
आता ब्रेसवेलने भारताविरुद्ध माहीच्या शतकाची बरोबरी केली आहे. ब्रेसवेलने भारतापूर्वी २०२२ मध्ये आयर्लंडविरुद्ध नाबाद १२७ धावांची खेळी केली होती, तर धोनीने आफ्रिका इलेव्हन आणि पाकिस्तानविरुद्ध या स्थानावर शतके झळकावली होती. ब्रेसवेलने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ७८ चेंडूचा सामना करताना, १२ चौकार आणि १० षटकार लगावले.
सामन्याबद्दल बोलायचे, तर सलामीवीर शुबमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना भारताला ३४९ धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. गिल व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला ४० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार रोहित शर्माने ३४ आणि सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या. भारताकडून द्विशतक झळकावणारा गिल हा ५वा खेळाडू ठरला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाला सुरुवातीला धक्के देत भारतीय गोलंदाजांनी बॅकफूटवर ढकलले. ब्रेसवेल फलंदाजीला आला तेव्हा पाहुण्यांनी ११० धावांत ५ विकेट गमावल्या होत्या, कर्णधार टॉम लॅथमदेखील त्याला साथ देऊ शकला नाही आणि न्यूझीलंडने १३१ धावांवर त्यांची ६वी विकेट गमावली. त्यावेळी भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण ब्रेसवेल आणि सँटनरने सामन्यात मोठी भागीदारी केली.
दोन फलंदाजांमधील ७व्या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारी ही वनडे क्रिकेटच्या इतिहासातील या स्थानावरील तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे.
४६ व्या षटकात येताना, सिराजने सँटनरसह हेन्री शिपलीला बाद करून भारताला सामन्यात परत आणले, परंतु ब्रेसवेल अजूनही दुसर्या टोकाला ठाण मांडून होता. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला २० धावांची गरज होती आणि ब्रेसवेलने शार्दुल ठाकूरचे षटकार मारून स्वागत केले, परंतु पुढच्याच चेंडूवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला आणि न्यूझीलंडचा संघ ३३७ धावांवर आटोपला. ब्रेसवेलने १२ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १४० धावांची शानदार खेळी केली. ७व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही फलंदाजाने केलेली ही चौथी सर्वोत्तम धावसंख्या होती.
७व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –
१७०* ल्यूक रोंची विरुद्ध एसएल ड्युनेडिन २०१५
१४६* मार्कस स्टॉइनिस विरुद्ध न्यूझीलंड ऑकलंड २०१७
१४० थिसारा परेरा विरुद्ध न्यूझीलंड माउंट मौनगानुई २०१९
१४० मायकेल ब्रेसवेल विरुद्ध भारत हैदराबाद २०२३
१२८ एमएस धोनी विरुद्ध आफ्रिका इलेव्हन २००७